जामखेड पंचायत समितीमध्ये 3 दिवसीय रोजगार हमी योजना प्रशिक्षण कार्यक्रमास सुरुवात, महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचा जनक, पण…

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचे जनक आहे. परंतु पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, केरळ या राज्यांच्या तुलनेत योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र कमी का पडत आहे ?  याचा रोजगार सेवकांसह सर्व संबंधितांनी विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी सर्वांनी प्रभावी योगदान द्यावे, असे अवाहन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले.

3-day employment guarantee scheme training program started in Jamkhed Panchayat Samiti,

जामखेड पंचायत समितीत आजपासून 3 दिवसीय रोजगार हमी योजना प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पोळ बोलत होते. यावेळी सहायक गटविकास अधिकारी दयानंद पवार, कृषी अधिकारी अशोक शेळके, विस्तार अधिकारी सुनील मिसाळ, बापूराव माने, सिद्धनाथ भजनावळे, एपीओ समीर शेख, तांत्रिक सहायक  संजय वायभासे, प्रदीप निमकर, विकास घाडगे, संभाजी ढोले, शिवराज जगताप, तज्ञ प्रशिक्षक संतोष शिंदे , निलेश तनपुरे, ऑपरेटर नितीन व्हावळ, अशोक गाजरे, विशाल पांढरे, सुरेश सोंदलकर व तालुक्यातील सर्व रोजगार सेवक उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रकाश पोळ म्हणाले की, ग्रामीण भागातील अकुशल मजुरांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यामाध्यमांतून गावागावात शाश्वत मत्ता तयार करणे ही रोजगार हमी योजनेची मुख्य उद्दिष्टे आहेत. मागील दोन वर्षांपासून कुटुंबांना लखपती करणे हे तिसरे उद्दिष्ट समोर आले आहे. रोजगार हमी योजनेत अनुज्ञेय असलेल्या वैयक्तिक व सार्वजनिक कामाच्या माध्यमांतून कुटुंबांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत असे पोळ म्हणाले.

गोरगरीब, वंचित, दारिद्रयरेषेखालील, भूमिहीन कुटुंबांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी रोजगार हमीच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या माध्यमांतून लखपती करण्यासाठी रोजगार सेवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन पंचायत समिती जामखेडचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले.

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सर्वाधिक मागणी गायगोठे, शेळीपालन शेड तसेच शाळेच्या संरक्षक भिंती, रस्ते, अंगणवाडी या कामांना आहे. परंतु जामखेड तालुक्यात अकुशल कामांचे प्रमाण कमी असल्याने वरील कुशल कामे मोठ्या प्रमाणात मंजूर करता येत नाहीत. त्यामुळे लाभार्थी वंचित राहतात.

यावर उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात अकुशल कामे जसे की, वृक्षलागवड, फळबाग लागवड, घरकुल, मुरमाचे रस्ते, जलसंधारण कामे झाली पाहिजेत. जेणेकरून या कामातून जास्तीत जास्त मनुष्यदिन निर्मिती होऊन कुशल कामासाठी अवकाश तयार होईल. जेव्हा 60 रु चे अकुशल काम होते तेव्हा 40 रु. कुशल कामासाठी उपलब्ध होतात. त्यामुळे जितके अकुशल काम जास्त तितके कुशल काम जास्त होणार आहे.