11th Admission । अकरावीच्या प्रवेशासाठी अजून वाट पहावी लागणार, कारण…

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्य मंडळाने 10 वी आणि 12वीच्या परीक्षांचे निकाल (Maharashtra state board Result 2022) जाहीर केले आहेत. त्या आधीच अकरावीची प्रवेश प्रक्रिया (11th Admission Procedure) सुरु करण्यात आली आहे. यंदा ही प्रवेश प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये होणार आहे.

पहिल्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना निकालाआधी त्यांची माहिती भरून नोंदणी करायची होती . यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स अपलोड करायचे होते आणि कागदपत्रं अपलोड करायचे होते.मात्र हा दुसरा टप्पा (11th admission procedure second part) अजूनही सुरु होऊ शकला नाही. यासाठी विद्यार्थ्यांना थोडी बघावी लागणार आहे.यासंबंधीचं कारण शिक्षण संचालकांनी सांगितलं आहे.

सन 2022-23 मध्ये प्रथमच राज्य मंडळाचे इ.10 वी परीक्षा निकाल CBSE च्या अगोदर जाहीर झालेले आहेत. परंतु ‘सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन’ने (CBSE Term 2 result 2022) अद्याप निकाल जाहीर केले नाहीत. IGCSE व NIOS वगळता अन्य शिक्षण मंडळांचे इयत्ता 10वी निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत.

दरवर्षी 11वी राज्य मंडळाच्या कनिष्ठ महाविद्यालयात होणाऱ्या एकूण प्रवेशापैकी साधारणपणे 5% विद्यार्थी हे CBSE मंडळाचे असतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया थांबवून ठेवणं आवश्यक आहे असं शिक्षण संचालक महेश पालकर यांनी सांगितलं आहे.

त्यामुळे शासनाने स्टेट बोर्ड आणि CBSE च्या सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी अन्य मंडळांचे विद्यार्थ्यांची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती शिक्षण संचालकांनी दिली आहे. त्यामुळे CBSE चा निकाल जाहीर होताच पुढील कार्यवाही सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे असंही त्यांनी म्हंटलंय.

भौतिक सुविधा तपासून कनिष्ठ महाविद्यालयाची अधिकतम प्रवेश क्षमता ठरवण्याचं कामकाज शिक्षण उपसंचालक स्तरावरून सुरू आहे. त्यामुळे अपुऱ्या सुविधा व भरमसाठ प्रवेश अशी परिस्थिती टाळण्यास मदत होईल अशीही माहिती शिक्षण संचालकांनी दिली आहे.

CBSE आणि इतर शिक्षण मंडळांचे निकाल जाहीर होत नाहीत तोपर्यंत ऑनलाईन प्रवेशासाठीचा पहिला टप्पा भरून तो verify करून घेण्याची प्रक्रिया सुरू ठेवलेली आहे. प्रवेश फेरी वेळापत्रक व दुसऱ्या टप्प्यातील फॉर्म भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल अशीही माहिती देण्यात आली आहे.

मात्र जोपर्यंत ही प्रक्रिया सुरू होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे मिळविणे मिळविणे सुरू ठेवावे. तसंच ज्याठिकाणी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नाही त्या ग्रामीण भागातील 11 वी प्रवेश सुरू झालेले आहेत अशीही माहिती देण्यात आली आहे. असे वृत्त news 18 लोकमतने दिले आहे.