Vishal Fate video | बार्शीचा हर्षद मेहता विशाल फटे संदर्भात समोर आली मोठी अपडेट !

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । महाराष्ट्रात बार्शीतील विशाल फटे स्कॅमने मोठी खळबळ उडवून दिली आहे. बार्शीच्या विशाल फटे या ठगाने आर्थिक गुंतवणूकीवर दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तब्बल 200 ते 500 कोटींचा चुना लावल्याचे उघडकीस आले आहे. कोट्यावधी रूपयांची फसवणुक करणाऱ्या विशाल फटे याच्यासंबंधी आज एक मोठी अपडेट समोर आली आहे. (Vishal Fate Video, vishal fate scam, barshi vishal fate scam, vishal fate YouTube channel)

बार्शीतील विशाल फटे स्कॅमचा मुख्य सूत्रधार विशाल फटे याचा एक व्हिडीओ आज समोर आला आहे.स्वत: विशाल फटे (Vishal Fate youtube Channel) यानं एक व्हिडीओ स्वता:च्या युट्यूब चॅनलवर शेअर करत या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे.

बार्शीतील फटे प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल फटेनं स्वतःची बाजू मांडली आहे. लोकांना फसवण्याचा कोणताही हेतू नव्हता, काही चुका झाल्या त्यामुळे पैसे अडकले. मला माझ्या चुका मान्य असून मी शिक्षा भोगायला तयार आहे. आज पोलिसात हजर होणार असल्याचंही तो म्हणाला.

स्वतःच्या युट्युब चॅनेलवरून घडलेल्या गोष्टींबाबत त्यानं स्पष्टीकरण दिलं आहे. 27 मिनिटं 37 सेकंदचा व्हिडीओ अपलोड करून स्वतःची बाजू त्यानं मांडली आहे. विशालनं म्हटलं आहे की, अनेकांनी चर्चा केली की 200 कोटींचा घोटाळा आहे. मात्र जास्तीत जास्त 10 कोटी रुपये मला लोकांचे द्यायचे आहेत, असं तो म्हणाला.

तो म्हणाला की, मी इज्जतीला घाबरुन सगळ्या गोष्टी मॅनेज करण्याचा प्रयत्न करतोय. अंबारेनं माझ्याविरोधात केस केली. त्यानं मला विचारायला हवं होतं. सहा महिन्याच्य वर मी कुणाचेही पैसे ठेवले नाही. माझ्यावर त्यानं पुरावे नसताना आरोप केले, असं तो म्हणाला.

10 लाखाचे 6 कोटी करणार याबाबतही चर्चा केली. मी सगळा डेटा लोकांना दिलाय. मला कुणाचे पैसे बुडवायचे नव्हते आणि नाहीत. दोन दिवसात मी गोष्टी मॅनेज केल्या असत्या पण अचानक केसेस पडू लागल्या. ज्या लोकांकडून पैसे येणं अपेक्षित होतं ते आले नाहीत. सगळ्या वाईट गोष्टींची चैनच सुरु झाली. आता माझ्या आवाक्याच्या बाहेर गोष्ट केली. लोकांनी मला वेळ दिला नाही. आता मला त्यांनी वेळ द्यावा अशी अपेक्षाही नाही, असं तो म्हणाला.

काय आहे विशाल फटे स्कॅम ?

विशाल हा गुंतवणुकदारांना वेगवेगळी स्किम सांगून अमिष दाखवत होता. डिसेंबर महिन्यात अशाच पद्धतीची एक ऑफर त्याने गुंतवणुकदारांना दिली. ‘एक जानेवारी 2022 पासून एक नवीन स्कीम सुरु होत आहे. ज्यामध्ये केवळ 40 गुंतवणुकदारांना घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे ही स्कीम केवळ नवीन गुंतवणुकदारांसाठी आहे. या स्कीमनुसार जर 1 जानेवारी 2022 रोजी तुम्ही 10 लाख रुपये जमा केले आणि त्यानंतर 1 वर्ष कोणताही परतावा घेतला नाही तर तुम्हाला 2023 साली 6 हजार टक्के परतावा मिळेल. म्हणजेच 10 लाखांचे वर्षात 6 कोटी रुपये होतील’ अशी ऑफर दिल्यानंतर अनेकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. 6 कोटी घेण्यासाठी बार्शीत अनेकांनी आपल्या जमीनी विकल्या, फ्लॅटवर लोन काढले. कित्येकांनी सोने गहाण ठेवले. तर काही जणांनी खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन गुंतवणूक केली होती अशी धक्कादायक माहिती आता समोर येत आहे.

अनेकांना कोट्यावधी रूपयांचा चुना लावलेला विशाल हा फक्त बीए आहे. विषेश म्हणजे ही पदवी त्याने यशवंतराव मुक्त विद्यापीठातून घेतली आहे. 11 वीचे शिक्षण घेण्यासाठी तो पुण्यात आला. परंतु, 11 वी मध्ये तो नापास झाला. त्यामुळे 12 वीसाठी त्याच्या कुटुंबीयांनी त्याला बार्शीला आणले. बार्शीत तो 12 वीत कसा तरी पास झाला. परंतु, आपण आयटी इंजिनीयर असून एमबीए फायनान्सचं शिक्षण घेतल्याचे तो सांगत असे. विशालचे इंग्रजी भाषेवर चांगलेच प्रभुत्व होते. त्यामुळे तो अनेकांना हुशार वाटायचा. लोक त्याच्या बोलण्यावरूनच त्याच्यावर विश्वास ठेवायचे.

विशाल उच्च पदस्थ अधिकारी, राजकारणी यांच्या सोबतचे फोटो लोकांना दाखवयचा. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे एका वाहिनीने केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते दिलेला पुरस्कार. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते आपल्याला पुरस्कार मिळाल्याचे लोकांना सांगताच अनेकांचा त्याच्यावरील विश्वास वाढला. सत्कारासाठी ऑफिसमध्ये रांगा, सोशल मीडियावर फोटो फिरु लागले होते. यामुळे केवळ बार्शीच नाही तर महाराष्ट्रातील अन्य भागांमधून देखील लोकांनी पैसे विशालकडे गुंतवले. परंतु, हे सगळे खोटे असल्याचे समजल्यानंतर आपण फक्त फोटो पाहून लाखोंना बुडाल्याची भावना लोक आता व्यक्त करत आहेत.

फक्त बीए पास झालेला विशाल हा अलका शेअर सर्व्हिसेसचा संस्थापक असून फोग्स ट्रेडिंग कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक आहे. याबरोबरच NSEBSE चे सदस्य असल्याची माहिती तो लोकांना सांगायचा. त्याने 2019 पासून अनेकांकडून गुंतणूक करून घेतली. यातील अनेकांना त्याने 28 टक्के परतावाही दिला. धक्कादायक बाब म्हणजे 27 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते विशालला एका वाहिनीचा पुरस्कार देण्यात आला होता.

विशालने बार्शीत बरेच मित्र जमवले होते. अगदी सख्या भावाप्रमाणे विशालचे मित्र त्याला वागणूक देत होते. विशालने याच विश्वासाचा फायदा घेत अनेक मित्रांचे अकाऊंट वापरले. गुंतवणुकदारांना मित्राच्या अकाऊंटवर पैसे टाकायला सांगायचे. मित्रांकडून चेक घेऊन ते पैसे काढून घ्यायचे असे उद्योग तो करत होता. फरार होण्याआधी देखील त्याने अशाच पद्धतीने एका मित्राच्या अकाऊंटवर जवळपास 35 लाख रुपये ट्रान्सफर केले होते. नंतर चेकद्वारे त्याने ते काढून देखील घेतले. अशी माहिती या प्रकरणी प्रथम फिर्याद दिलेले दीपक आंबरे यांनी दिली.

विशाल बार्शी येथील शिवाजी महाविद्यालयासमोर नेट कॅफे चालवत होता. नेट कॅफे चालवत असतानाच तो छोट्या प्रमाणात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक देखील करत होता. परंतु, आपण मागील 10 ते 15 वर्षांपासून शेअर मार्केट करत असल्याचे लोकांना सांगत होता. विशाल फटे हा मुळचा मंगळवेढा तालुक्यातील आहे. त्याचे वडील बार्शीतील एका महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून ते बार्शीतच वास्तव्यास होते. सध्या बार्शीतील अलीपूर रोड ते उपळाई रोड दरम्यान तो राहायला होता.

विशाल हा तीन महिन्यात पैसे दाम दुप्पट करण्याचे आमिष दाखवत असे. प्रथम त्याने लोकांकडून लाखो रुपये घेतले. त्यांना मोठा परतावा देऊन लोकांचे विश्वास संपादन केले. त्यानंतर तीन महिन्यात दाम दुप्पट देण्याचे आमिष त्याने अनेकांना दिले. आधी दिलेल्या परताव्यवरून अनेकांनी विश्वास ठेवून कोट्यावधी रुपये फटे याच्याकडे गुंतवणुकिसाठी दिले होते.

विशालच्या विशाल घोटाळ्यासंदर्भात आतापर्यंत 76 जणांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फसवणूकीचा आकडा तब्बल 18 कोटींवर पोहोचला आहे.विशाल फटे याने बार्शी आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेकांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणात बार्शीतील बड्या नेत्यांसह काही प्रतिष्ठीत मंडळींना मोठा फटका बसला आहे, अशी चर्चा सुरु आहे. तर अनेक गोरगरीबांना देखील विशाल फटेनं चुना लावला आहे.

तीन महिन्यात पैसे दुप्पट करण्याचं आमिष दाखवून कोट्यावधींची माया विशालने जमा केली. परंतु, हाच विशाल आता 9 जानेवारीपासून फरार आहे. त्यामुळे आधी श्रीमंत होण्याची स्वप्न दाखणाऱ्या विशालने फरार होत अनेकांची झोप उडवली आहे.विशाल फटे स्कॅमप्रकरणात पोलिसांनी विशालच्या वडिलांसह भावाला अटक केली आहे. विशाल फटे स्कॅम प्रकरणावर SIT ची स्थापन करण्यात आली आहे. विशाल फटेला तातडीने बेड्या ठोकून गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्याचे मोठे अव्हान आता प्रशासना समोर उभे ठाकले आहे.