दसरा मेळाव्याआधी ठाकरे – शिंदे गटांत टिझर युध्द, राज्याचं राजकीय वातावरण तापलं, कोण मारणार बाजी याकडे लागले महाराष्ट्राचे लक्ष !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राज्यातील सत्तासंघर्षात अजूनही तोडगा निघालेला नाही. शिवसेनेत निर्माण झालेल्या बंडखोरीचा वाद सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. त्यातच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गट आमने सामने उभे ठाकले आहेत. कोणत्या गटाचा दसरा मेळावा दमदार होणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
दसरा मेळाव्याआधीच राज्याचं राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेची खरी ओळख असलेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा आवाज पुन्हा शिवाजीपार्कवर घुमणार आहे. तर शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटाचा मेळावा वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर होणार आहे. दसरा मेळावा आधीच शिवसेना आणि शिंदे गटात टीझर वॉर सुरू झाले आहे.शिंदे गटाने दोन टीझर लाँच केले असून शिवसेनेने आज पहिला टीझर लाँच केला आहे.
शिवसेनेत फूट पडल्याने राज्यातील सत्तासंघर्ष तीव्र बनला आहे. शिवसेनेला पुन्हा मजबूत करण्यासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे तसेच इतर जेष्ठ नेते तसेच युवा सेना मेहनत घेताना दिसत आहे. तर दुसरीकडे खरी शिवसेना आमचीच असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून केला जात आहे. याचाच भाग म्हणून शिंदे गटासाठी अनेकांचा पाठिंबा मिळवला जात आहे. त्यातच दसरा मेळाव्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाने दंड थोपटले आहेत. दसरा मेळाव्यातून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यासाठी दोन्ही गटांनी मोठी मोर्चेबांधणी हाती घेतली आहे.
शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठी गुरुवारी आणि शुक्रवारी असे दो टीझर लाँच केले आहेत. गुरुवारी लाँच केलेल्या टीझरमध्ये ‘एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ’ अशा ओळी आहेत. टीझरमध्ये शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजाचा वापर करण्यात आला आहे. शुक्रवारीदेखील शिंदे गटाने आणखीन एक टीझर लाँच केला आहे. यामध्ये सभेला येण्याचे आवाहन करताना अप्रत्यक्षपणे ठाकरे गटावर हल्लाबोल करण्यात आला आहे.
तसेच शिवसेनेकडूनही दसरा मेळाव्याचा टीझर लाँच करण्यात आला. टीझरच्या सुरुवातीला ‘निष्ठेचा सागर उसळणार, भगवा अटकेपार फडकणार’ अशा ओळी असून शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचा वापर दिसून येत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाजात ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो’ अशी साद आहे. त्याशिवाय, दसरा मेळावा, शिवसेनेच्या जाहीर सभेतील दृष्ये आहेत. शिवसेनेच्या अधिकृत ट्वीटर हँडलवर हा टीझर लाँच करण्यात आला आहे.
दसरा मेळाव्यावरुन शिवसेना विरुद्ध शिंदे गट या दोन्ही गटात टिझर सुरू झाल्याने राज्याचं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. दसरा मेळाव्याच्या दिवसापर्यंत हा संघर्ष अधिकच उफाळून येताना दिसणार आहे.