गळीत हंगाम 2022 | मापात पाप करणाऱ्या साखर कारखान्यांना साखर आयुक्तांचा दणका, ‘तो’ प्रस्ताव मंजूर होताच साखर आयुक्तांनी काढले नवीन आदेश !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । राज्यातील साखर कारखान्यांकडून काटामारी करून ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या घामावर डल्ला मारण्याचे पाप नेहमी केले जाते, याच काटामारीला लगाम लावावा अशी सातत्याने मागणी होत होती. त्यानुसार साखर आयुक्त कार्यालयाकडून कठोर पाऊले उचलण्यात आली आहेत. त्यामुळे आता मापात पाप करणाऱ्या साखर कारखान्यांना मोठा दणका बसणार आहे.

Sugarcane harvesting season 2022, Sugar commissioner slaps sugar mills who sin in measurement, Shekhar Gaikwad

साखर कारखान्यावरील वजनकाट्यांची फेरतपासणी करणे, सर्व वजनकाटे संगणकीकृत करून ऑनलाईन करावेत तसेच वैधमापन शास्त्र अधिकाऱ्यांनी लावलेल्या टॅगला छेडछाड करू नयेत, असे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांकडून होणारी काटामारी बंद होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

साखर कारखाने काटामारी करतात, हा शेतकरी आणि शेतकरी संघटनांचा जुना आरोप आहे. खासगी आणि कारखान्यांच्या वजनकाट्यांवरील वजनात तफावत दिसून येते. वैधमापन शास्त्र अधिकाऱ्यांनी तपासणी करून टॅग लावल्यानंतर त्याच्याशी छेडछाड केली जाते. खासगी वजनकाट्यांवर वजन केलेला ऊस कारखानदार घेत नाहीत, असे आरोप अनेकदा केले जात होते. पण, त्याबाबत ठोस उपाययोजना होत नव्हती.

साखर आयुक्तालयाने या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन मागील गाळप हंगामात या बाबतचा प्रस्ताव वैधमापन शास्त्र विभागाच्या महासंचालकांना पाठविला होता. तो प्रस्ताव मंजूर झाला आहे.

साखर आयुक्तांनी बुधवारी ९ नोव्हेंबर रोजी काढलेल्या आदेशात काय म्हटले आहे ? वाचा

  • राज्यातील सर्व कारखान्यांनी आपल्या वजनकाट्यांची फेरतपासणी करून घ्यायची आहे.
  • तपासणी करून वैधमापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकदा टॅग लावल्यानंतर टॅगशी कोणतीही छेडछाड करायची नाही.
  • वजन काट्याच्या केबल अखंड असाव्यात, त्या कुठेही जोडलेल्या नसाव्यात, त्या केबलला कोणतेही अनधिकृत उपकरण जोडलेले नसावे.
  • वजनकाट्याची पावती संगणकीकृत असावी.
  • ज्या वाहनांतून ऊस आलेला आहे, त्या वाहनाचा क्रमांक पावतीवर असावा.पावती सही, शिक्क्यांसह द्यावी.
  • वजनकाट्याची सर्व माहिती ऑनलाइन करावी.महिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून द्यावी.
  • खासगी वजनकाट्यावर वजन करून आणलेला ऊस नाकारता येणार नाही, असेही वैधमापन विभागाने म्हटले आहे.

शेतकरी आणि शेतकरी संघटनांची अनेक वर्षांपासूनची ही मागणी होती. आता कारखान्यांवरील चुकीचे प्रकार थांबतील. कारखान्यांच्या वजनकाट्याबाबत पारदर्शकता येईल. खासगी वजनकाट्यावर वजन केलेला ऊस आता नाकारता येणार नाही. संबंधित आदेश तत्काळ लागू झाले आहेत. काटे संगणकीकृत, डिजिटल करण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. मात्र, पुढील हंगामापासून राज्यातील सर्व कारखान्यांचे वजनकाटे संगणकीकृत, डिजिटल होतील. असे साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले.