शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीवर जेष्ठ संपादक राजा माने यांची निवड

मुंबई,दि.11 जूलै 2023 :  पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीवर संपादक, राजकीय विश्लेषक व माध्यम तज्ज्ञ तसेच डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांची सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.

Selection of Senior Editor Raja Mane on Shankarao Chavan Journalist Welfare Fund Committee of Govt

पत्रकारांच्या आरोग्य व उपचार विषयक समस्या, आकस्मिक संकटे आणि पत्रकार सेवानिवृत्ती वेतन आदी सारख्या विषयांसाठी असलेल्या महाराष्ट्र शासनाने आर्थिक तरतूद करुन शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी समितीची स्थापना केलेली आहे.या समितीच्या सदस्यपदी राजा माने यांच्या नियुक्तीचे परिपत्रक शासनाने आज जारी केले. माने यांनी या पूर्वी सहा वर्षे महाराष्ट्र शासनाच्या कोल्हापूर व पुणे विभागीय पत्रकार अधिस्वीकृती समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे.

लोकमत माध्यम समूहात छत्रपती संभाजीनगर येथे १९८५ साली प्रशिक्षणार्थी उपसंपादक म्हणून म्हणून माने यांची कारकीर्द सुरु झाली.लोकमतचे परभणी जिल्हा प्रतिनिधी, अहमदनगर आवृत्ती प्रमुख, कोल्हापूर विभाग तसेच कोकण विभागाचे तसेच सोलापूर आवृत्तीचे संपादक म्हणून त्यांनी काम केले.लोकमतचे राज्य राजकीय संपादक म्हणून कार्यरत असताना त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.आपल्या कारकिर्दीत त्यांनी लातूरच्या दैनिक एकमतचे संपादक, दैनिक पुण्यनगरीचे सोलापूर, कोल्हापूर विभाग, कोकण व बेळगाव आवृत्त्यांचे कार्यकारी संपादक , दैनिक पुढारीचे पुणे व अहमदनगर आवृत्तीचे कार्यकारी संपादक म्हणून काम केले.

त्याच बरोबर सोलापूर सुराज्यचे संपादक, चेअरमन व कार्यकारी संचालक म्हणून देखील त्यांनी भूमिका बजावली.श्रमिक पत्रकार म्हणून ते सदैव कार्यरत आहेत.देशातील डिजिटल मिडियाची पहिली संघटना स्थापन करुन राज्यातील डिजिटल मिडियाला दिशा देण्याचे काम ते करीत आहेत.राज्यभरातील प्रतिष्ठित संस्थांचे शंभरहून अधिक मानाचे पुरस्कार त्यांना आजवर मिळाले आहेत.

त्यांची आठ पुस्तके प्रकाशित झाली असून महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा, ज्यांनी आभाळ कवेत घेतलं व लेक माझी लाडकी ही पुस्तके विशेष गाजली व अनेक पुरस्कारांनी गौरविली गेली.तत्कालिन राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या समवेत त्यांनी ब्रिटन व सायप्रस या देशांचा दौरा केला.युरोप, अमेरिका, दुबई, इंडोनेशिया, इस्तांबूल-तुर्कस्थान आदी देशांचे अभ्यास दौरे केले आहेत.

त्यांच्या निवडीनंतर नवी मुंबईतील उद्योजक सिध्देश्वर चव्हाण व कुंदन हुलावळे यांनी माने यांचा सत्कार केला.नियुक्तीबद्दल राजा माने यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदें, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले व निवडीबद्दल डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेला  राज्यातील सर्व सदस्य, पदाधिकारी आणि तमाम पत्रकारांना आपल्या निवडीचे श्रेय दिले.