Sant Namdev Maharaj Punyatithi 2023 : संत नामदेव महाराज – एक कुशल संघटक

12 जुलै 2023 : हभप शामसुंदर महाराज सोन्नर : संत नामदेव महाराज हे वारीकरी प्रबोधन चळवळीचे रचनाकार आहेत. कीर्तनापासून ते अभंगापर्यंत आरतीपासून ते संत चरित्रापर्यंतच्या वारकरी परंपरांची सुरुवात नामदेव महाराज यांनी केली. ते कुशल संघटकही होते. विविध जातीतील 24 मराठी संतांना नामदेव महाराज यांनी वारकरी परंपरेत आणले.  इतकेच नव्हे तर कानडी संत पुरंदरदास आणि हिंदीतील कबीरासह अनेक संतांच्या रचनेवर नामदेव महाराज यांचा प्रभाव दिसतो. वारकरी परंपरेचे कळस म्हणून गौरविलेले तुकाराम महाराज हे तर नामदेव महाराज हेच आपल्या अभंग रचनेची प्रेरणा असल्याचे सांगतात. यावरून संत नामदेव महाराज हे उत्तम संघटक होते हेच स्पष्ट होते.

Sant Namdev Maharaj Punyatithi 2023, Sant Namdev Maharaj - A Skilled Organiser

संत नामदेव यांनी विवेकी वारकरी प्रबोधनाच्या प्रचारासाठी संपूर्ण भारत भ्रमण केले. तसे संपूर्ण भारताचे भ्रमण करणारे ते पहिले मराठी संत होते. ते संत चरित्रकार आहेत, आत्मचरित्रकार आहेत, पहिले वारकरी कीर्तनकार आहेत अशा विविध भूमिकांमध्ये आपण नामदेव महाराज यांना पाहू शकतो.

जातीभेद आणि कर्मकांडाच्या अंधारात चाचपडणा-या समाजाला नामदेवांनी ज्ञानदीप दिला. त्यावेळच्या व्यवस्थेच्या विरोधात बंडाचे निशाण फडकवीत असतानाही त्यांच्या भाषेत आक्रोष नव्हता, तर विनम्र शितला होती. हजारो वर्षांच्या जातीभेदाच्या भिंतींना धडका देत असताना त्यांनी कुठेही क्रांतीची भाषा केली नाही. सामाजिक विषमतेच्या आजारावर उपचार करीत असताना त्यांनी वरून मलमपट्टी केली नाही. अंतगरंगात शिरून बदलाची प्रक्रिया सुरू केली. पोटात घेतलेले औषध जसे शरीरावरची जखम बरी करते, तसाच नामदेवांच्या विचाराने समाज आतून बदलत गेला आणि समाजातील उच्च-नीचतेच्या भिंतींना तडे गेले. पंढरीची वारी त्या विचाराचे विराट रूप आहे.

परकीय आक्रमकांनी भारतावर जवळपास कब्जा मिळविलेला होता, त्याच वेळी स्थानिक सर्व समाज मात्र कर्मकांडात अडकला होता. जातीभेद आणि उच्च-नीचतेच्या भोव-यात अडकलेला होता. उच्च वर्णीयांची अरेरावी आणि आक्रमकांची दादागिरी यात समाज भरडला जात होता. तेव्हा समाजाला कर्मकांडाच्या कचाट्यातून सोडवत असतानाच जातीभेदांना गाडून सर्वांना एका व्यासपीठावर आणण्याचे नामदेवांनी केलेले काम ही त्या काळातली क्रांतीच म्हणावी लागेल. परिसा भागवतांसारख्या ब्राह्मणापासून ते समाजातल्या शेवटच्या पायरीवर उभ्या असलेल्या चोखोबांपर्यंत सर्वांना एका व्यासपीठावर आणण्याचे त्यांनी केलेले काम हे सहज साध्य झाले असेल असे म्हणे केवळ भाबडेपणा ठरेल. त्यासाठी त्यांना घणघोर संघर्ष करावा लागला असेल. त्याच्या पाऊलखुणा नामदेव आणि त्यांच्या समकालिन संतांच्या अभंग रचनेत पहायला मिळतात.

सामाजिक विषमतेचे चटके नामदेवांनाही मोठ्या प्रमाणात बसले असल्याचे त्यांच्या काही रचनांमधून दिसून येते. शिंप्याच्या कुळात जन्म घेतल्यामुळे आपल्याला सामाजिक विषमतेचे चटके सोसावे लागतात ही तक्रार थेट देवाकडेच करताना नामदेव म्हणतात-

हिनदिन जात मोरी पंढरीके के राया।

ऐसा नामा दर्जी तुने काहेको बनाया॥
किंवा
नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपीll
उपमा जातीची देऊ नये l
त्यांच्या या रचनांवरूनच जातीव्यवस्थेच्या आगीत ते चांगलेच होरपळलेले दिसून येतात. म्हणून समाजातून बहिष्कृत केलेल्या ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताई या भावंडांना सोबत घेऊन ही विषमतेची दरी दूर करण्यासाठी नामदेवांनी पुढकार घेऊन वारकरी विवेकी प्रबोधन चळवळ उभी केली. त्यावेळच्या सर्व समाज घटकातील जे जाणते लोक होते त्यांना नामदेवांनी केवळ एकत्र आणले नाही, तर त्यांना व्यक्त होण्यासाठी लिहिते केले. त्याची सुरुवात त्यांनी आपल्या घरातूनच केली.

नामदेवांच्या घरामध्ये एकूण चौदा सदस्य असल्याचा उल्लेख जनाबाईच्या अभंगातून पहायला मिळतो. त्या सर्वांच्या नावाने काहीना काही अभंग आहेत. त्यांच्या घरात दासीचे काम करणा-या जनाबाईचे अभंग तर नामदेवांपेक्षाही अधिक बंडाची भाषा करतात. नामदेवांच्या चरित्राचा धांडोळा घेता त्यांच्या संगतीत एकंदर २४ संत कवी असल्याचे दिसून येते. ज्यात, कांदा मुळा भाजी। अवघी विठाबाई माझी।
म्हणणारे सावता माळी

वारीक वारीक करू हजामत बारीक।
म्हणणारे सेना महाराज

मनबुद्धीची कातरी। रामनामे सोने चोरी।
म्हणणारे नरहरी सोनार

स्त्री जन्म म्हणोनी न व्हावे उदास
म्हणारी जनाबाई

नको देव राया अंत आता पाहू।
असा टाहो फोडणारी कान्होपात्रा

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा
असे म्हणणारे चोखोबा आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब अशा समाजातल्या सर्व स्तरातील लोकांना एका व्यासपीठावर आणत असतानाच त्यांना लिहिते केले. त्यातही नामदेवांचा सर्वाधिक लळा हा चोखोबांच्या घराण्याशी असल्याचे दिसते. म्हणूनच नामदेवांच्या घरातले जसे सगळे लोक अभंगातून व्यक्त होत होते.

तसेच चोखोबांच्या घरातीलही बहुतेकांच्या नावे अभंग रचना आढळून येतात. चोखाबांच्या पत्नी सोयराबाई तर जनाबाई प्रमाणेच बंडखोर असल्याचे दिसून येते. जाती व्यवस्थेत आणि स्री म्हणून मिळणा-या हीन वागणुकीच्या आगीत भाजलेली सोयराबाई मासिक पाळीमध्ये विटाळ पाळण्याच्या प्रथेवर परखड शब्दांत भाष्य करतात. त्या लिहितात-
देहासी विटाळ म्हणती सकळl
आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध ll
देहीचा विटाळ देहीच जन्मला l
सोवळा तो झाला कवण धर्म ll
विटाळा वाचोनी उत्पत्तीचे स्थान l
कोण देह निर्माण नाही जगी ll
मासिक पाळी बद्दल तेराव्या शतकातील भाषा केवढी धिटाईची आहे. चोखोबांचा मुलगा कर्ममेळा आपल्याला हीन जातीत जन्माला घातल्याबद्दल देवाची लाज काडतो.
आमुची केली हिन जाती।
तूज न कळे श्रीपती।
जन्म गेला उष्टे खाता।
लाज नाही तुझ्या चित्ता।
असा थेट सवाल देवाला करतो.
नामदेवांच्या संगतीत राहिल्यानेच कर्ममेळा यांच्यात हे कटू वास्तव मांडण्याचे धाडस आले असावे. अर्थात हे सर्व करीत असताना नामदेवांना त्या वेळच्या समाजधुरीणांकडून खूप त्रास सहन करावा लागणार असणार. नामदेवाने केलेली अभंग रचना आणि किर्तन परंपरा केवळ आध्यात्मिक उपचार नव्हता तर त्यामागे प्रचंड दूरदृष्टी होते. सामाजिक समतेची आस होती असे दिसते.

मंगळवेढा येथे वेठबिगारी करताना भिंत कोसळून चोखोबांचा मृत्यू झाला तेव्हा नामदेवांनी त्यांचे प्रेत शोधून काढून त्यांची समाधी थेट पांडुरंगाच्या दारात बांधली. चोखाबांची समाधी पांडुरंगाच्या महाद्वारात बांधणे या घटनेकडे केवळ धार्मिक उपचार म्हणून पाहाता येणार नाही. चोखोबांची पांडुरंगावर श्रद्धा होती म्हणून नव्हे, किंवा नामदेवांचे चोखोबांवर प्रेम होते म्हणून ही समाधानी तिथे बांधली, असे होणारेय येणार नाही. तर त्यामागे सामाजिक बदलाची प्रक्रिया सुरू व्हावी, असा उद्देश दिसतो. समाजातील सर्वात तळाच्या माणसाच्या चरणावर लीन झाल्याशिवाय ब्रह्मांडांचा धनी असणा-या पांडुरंगाचे दर्शन होणार नाही, ही विचारधारा त्यांना बळकट करायची असावी. चोखोबांची समाधी तिथे बांधताना त्यावेळच्या लोकांनी कोणताच विरोध केला नसेल, असे म्हणता येणार नाही. परंतु तो सर्व विरोध मोडून काढून नामदेवांनी वेगळा संदेश देण्याचा केलेला प्रयत्न कोणत्याही क्रांतीपेक्षा कमी ठरत नाही.

महाराष्ट्रातील समाज सुधारणांचा हा विचार भारतात सर्वत्र रुजावा याच भावनेतून त्यांनी भारत भ्रमण केले. त्यात उत्तर भारतात त्यांना अनेक अनुयायी मिळाले. ते सर्वाधिक काळ पंजाबमध्ये रमले. त्यांनी पंजाबी शिकली. त्यांनी हिंदी आणि पंजाबी भाषेतही अभंग रचना केली. गुरुनानकांनी शिख धर्माची स्थापना करून पुढील शिष्यांसाठी कोणत्याही माणसाला गुरु करण्यापेक्षा ग्रंथालाच गुरू करा, असा संदेश दिला. त्या गुरुग्रंथसाहेबमध्ये नामदेवांचे 61 अभंग समाविष्ट केलेले आहेत. यावरून नामदेवांच्या कार्याचा आवाका आपल्या लक्षात येतो.

कोणत्याही क्रांतीचा घोष न करता, आक्रस्ताळेपणा न करता संत नामदेवाने जो समतेचा विचार रुजविला तो त्यांच्या नंतर सुधारणावादी संत एकनाथ यांनी पुढे नेला आणि त्याला खरी झळाळी जर कोणी दिली असेल तरी संत तुकाराम महाराजांनी दिली. नामदेवांनी साडेसातशे वर्षांपूर्वी जी समतेच्या विचाराची पेरणी केली त्याचे विराट रूप आता पंढरीच्या वारीच्या रूपाने पहायला मिळते.

नामदेवांनी सुरू केलेली ही विवेकी प्रबोधनाची परंपरा महाराष्ट्राच्या कानाकोप-यात भक्कमपणे सुरू आहे. सध्या तिला भ्रष्ट करण्याचा उद्योग काही छुप्या व्यवस्थांकडून होत आहे. तो रोखला पाहिजे. कारण आज महाष्ट्राच्या जवळपास प्रत्येक गावात हरीनाम सप्ताह सुरू आहेत. त्यात जर या परंपरेला भ्रष्ट करणारे घुसखोर रोखले नाहीत तर फार मोठी सामाजिक हानी होईल. या सप्ताहाच्या माध्यमातून नामदेवांसह सर्व संतांनी दिलेला विवेकी प्रबोधनाचा वारसा पुढे गेला पाहिजे. त्यावर जाणत्या लोकांची नजर असली पाहिजे. त्यासाठी विवेकी निर्भेळ संत परंपरा पुढे नेणा-या कीर्तनकारांचे संघटन उभे राहणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने भविष्यात प्रयत्न व्हायला हवेत. तसे झाले तर ही विवेकी प्रबोधनाची परंपरा अधिक भक्कम होईल.

पंढरपूरात दिंडी
श्री संत नामदेव महाराज महासंजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री संत कैकाडी महाराज मठ ते नामदेव पायरी दिंडी सोहळा. संयोजक कैकाडी महाराज यांचे वंशज, मठाधिपती भारत महाराज जाधव.

ह. भ. प. शामसुंदर सोन्नर महाराज
संस्थापक अध्यक्ष-  वारकरी विचार मंच
संपर्क: 9594999409, 9892673047