Poisoning of 200 people | धक्कादायक | 200 जणांना विषबाधा | गावकऱ्यांना लग्नातील जेवण पडले महागात  

नांदेड जिल्ह्यातील घटनेने उडाली मोठी खळबळ

Poisoning of 200 people | जामखेड टाईम्स वृत्तसेवा :  राज्यात कोरोना थंडावला आहे. कोरोना निर्बंध शिथील झाल्याने सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत.अश्यात आता रखडलेले विवाह मोठ्या धुमधडाक्यात राज्यात साजरे होत आहेत.

विवाह सोहळ्यांना मोठी गर्दी होत आहे.अश्याच एका विवाह सोहळ्यासाठी गेलेल्या गावकऱ्यांना लग्न भलतेच महागात पडले आहे. तब्बल दोनशे जण विषबाधेचे शिकार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

लग्नाच्या पंगतीत भोजन केलेल्या 200 जणांना विषबाधा झाल्याची घटना नांदेड जिल्ह्यातून समोर आली आहे. या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर असे की, नांदेड जिल्ह्यातील कंधार या तालुक्यातील दिग्रस खुर्द (Kandhar) येथे रविवारी (ता.२१) एका लग्नातील जेवणाने जवळपास दोनशे जणांना विषबाधा (Food Poisoning) झाली. दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता.२२) दुपारी गावातील लहान-मोठ्यांना मळमळ, उलटी, चकरा, हातपाय दुखणे, जुलाब येणे असे प्रकार सुरू झाल्यानंतर ही बाब उघड झाली.यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले.

उलटी, चकरा, हातपाय दुखणे, जुलाब होणे असा त्रास सुरू होताच रुग्णांनी जवळील उपकेंद्र गाठले. त्यानंतर रुणांवर उपचार सुरू झाले. काही रुग्णांना कंधार येथे रेफर करण्यात आले. विषबाधा झालेला कोणताही रुग्ण गंभीर नसल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साहेबराव ढवळे यांनी दिली.

रविवारी दिग्रस बुद्रुक येथील कल्याणकर कुटुंबात लग्न कार्य होते. लग्न लागल्यानंतर लगेच जेवणाच्या पंगती सुरू झाल्या. दुपारी चार वाजेपर्यंत जेवण सुरू होते. (Nanded) दुसऱ्या दिवशी दुपारपासून लग्नात जेवण केलेल्यांना अस्वस्थ वाटू लागले.यामुळे विषबाधेचा प्रकार उघडकीस आला. लगेच रुग्णांनी गावातील उपकेंद्रात दाखल होऊन उपचार घेतले.

७० ते ७५ रुग्णांना कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यकांत लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांचे पथक रुग्णावर लक्ष ठेऊन आहेत. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ढवळे यांनी मंगळवारी (ता.२३) सकाळी दिग्रस खु. येथील उपकेंद्राला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आणि काही रुग्णांना कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले.

घटनेची माहिती समजताच उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलकंठ भोसीकर, तहसीलदार संतोष कामठेकर यांनी कंधार येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन रुग्णाची विचारपूस केली व परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या सर्व रुग्णाची प्रकृती स्थिर असून बऱ्याच जणांवर प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ढवळे यांनी दिली.

दरम्यान विषबाधा नेमकी कश्यामुळे झाली याची अजून ठोस माहिती समोर आलेली नाही. आरोग्य यंत्रणा याचा शोध घेत आहे. लग्नातील पंगतीत कुठला पदार्थ खाल्याने नागरिकांना विषबाधा झाली याची सत्यता समोर येणे आवश्यक आहे.