Devasthan land scam in Ashti | बहुचर्चित देवस्थान जमीन घोटाळ्याप्रकरणी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना; आष्टीतील बडे मासे येणार रडारवर ?

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Devasthan land scam in Ashti

राज्यात गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा जमीन घोटाळा प्रकरणामुळे चर्चेत आला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वक्फ इनामी आणि देवस्थान जमिनींचा घोटाळा चर्चेत आला आहे.शेकडो एकर जमीन हडपल्याप्रकरणी आष्टीत दोन गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात आता एक मोठी घडामोड समोर आली.

आष्टी तालुक्यातील बहुचर्चित देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणात दाखल झालेल्या दोन गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) समिती स्थापन करण्यात आली आहे.अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज कुमावत हे तपास अधिकारी म्हणून काम करणार आहेत.

बीड जिल्ह्यातील देवस्थान जमिनीचे घोटाळे मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आष्टी पोलीस ठाण्यात देवस्थान जमीन घोटाळा प्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घोटाळ्यात महसूल विभागाच्या काही अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे.

देवस्थान जमीन घोटाळ्यांमध्ये काही राजकीय व्यक्तींचा संबंध असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षकांनी एसआयटी स्थापन केली आहे.

एसआटीमध्ये यांचा असणार समावेश

अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित धाराशिवकर, आष्टीचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, पोलीस उपनिरीक्षक आर.ए.शेख हे या समितीत असणार आहेत.

भाजपा आमदार सुरेश धस अडचणीत ?

भाजपा आमदार सुरेश धस यांनी 450 एकर देवस्थान आणि वक्फच्या जमिनी लाटून एक हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप औरंगाबादेत ॲड असीम सरोदे यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली होती. सरोदे यांनी आष्टीतील आरटीआय कार्यकर्ते राम खाडे यांच्या बाजुने भूमिका मांडली होती. खाडे यांनी लाचलुचपत विभागाकडे या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. तसेच ईडीकडेही स्वतंत्र तक्रार दाखल केली जाणार असल्याचे सरोदे यांनी स्पष्ट केले होते.

धसांवरील आरोपांवर समर्थकांनी दिले प्रत्युत्तर

भाजपा आमदार सुरेश धस यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचा धस समर्थक कार्यकर्त्यांनी जोरदार समाचार घेतला. धस यांची बदनामी करण्याबरोबरच नगरपंचायत निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन धसांवर बिनबुडाचे आरोप करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचे धस समर्थकांचे म्हणणे आहे.