जामखेड : साकत घाटात भाविकांची मिनीबस उलटली; भीषण अपघातात ४ जण गंभीर, तर २० प्रवासी जखमी

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड जवळील साकत घाटात रात्रीच्या सुमारास भाविकांच्या मिनीबसला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात वळणाचा अंदाज न आल्याने भाविकांनी भरलेली मिनी ट्रॅव्हल्स थेट संरक्षक कठडा तोडून घाटातील खड्ड्यात कोसळली. या अपघातात ४ जण गंभीर जखमी झाले असून २० प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.

याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मध्यप्रदेश येथील बऱ्हाणपूर येथून सुमारे २२ भाविकांना घेऊन एक मिनी ट्रॅव्हल (क्र. डीडी ०१ एएल ९७७७) मुक्ताईनगर, शेगाव, औंढा नागनाथ आणि तुळजापूर दर्शन करून जेजुरी व पुण्याकडे निघाली होती. मंगळवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास ही गाडी साकत घाटात आली असता, चालकाने समोरील एका गाडीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रात्रीच्या अंधारात वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. मिनीबस थेट रस्त्या कडेला असलेल्या संरक्षक कठड्याला आणि दिशादर्शक फलकाला जोरात धडक देऊन सरळ खाली घाटातील खोल खड्ड्यात कोसळली.

अपघातानंतर घाटात एकच हाहाकार

रात्रीच्या गाढ अंधारात अचानक झालेल्या या भीषण अपघातामुळे घाटात प्रवाशांचा आरडाओरडा आणि एकच हाहाकार उडाला. काही प्रवासी गाडीच्या काचा तुटल्याने त्यातून कसेबसे बाहेर पडले. कोणाच्या हाताला, पायाला गंभीर दुखापत झाली, तर कोणाचे डोके फुटले होते. याच दरम्यान रस्त्यावरून जाणाऱ्या इतर गाड्यांमधील वाहनधारकांनी माणुसकी दाखवत आपली वाहने थांबवली. त्यांनी तातडीने अपघातग्रस्त गाडीच्या दिशेने धाव घेत सर्व जखमींना समोरून सुखरूप बाहेर काढले. तसेच घटनेची माहिती रुग्णवाहिकेला दिली. सर्व जखमींना तात्काळ जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

४ गंभीर जखमींना नगर व पुण्यात हलवले

या अपघातात वंदना कैलास महाजन, योगिता ज्ञानेश्वर महाजन, अनिल काशिनाथ महाजन आणि चालक गौरव महाजन हे चार जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जामखेड येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर (नगर) येथे हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर नगर येथे उपचार सुरू असून, यातील वंदना महाजन व योगिता महाजन यांच्या हातापायावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने त्यांना पुणे येथील रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. इतर २० प्रवाशांवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून ते सुखरूप आहेत.

साकत घाट बनला मृत्यूचा सापळा

जामखेड जवळील साकत घाट सद्यस्थितीत वाहन धारकांसाठी अत्यंत धोकादायक आणि ‘मृत्यूचा सापळा’ बनत चालला आहे. या घाटातील तीव्र आणि धोकादायक वळणे, दिशादर्शक फलकांचा अभाव आणि रात्रीच्या वेळी असणारा अंधार यामुळे येथे अपघातांची मालिकाच सुरू आहे. अनेकदा चालकांना वळणाचा अंदाज न आल्याने किंवा ओव्हरटेक करण्याच्या नादात वाहने थेट संरक्षक कठडे तोडून खोल दरीत वा खड्ड्यात कोसळतात.

नुकताच बऱ्हाणपूरच्या भाविकांच्या गाडीला झालेला भीषण अपघात ही याचाच एक ताजा आणि धक्कादायक पुरावा आहे. सातत्याने होणारे अपघात आणि निष्पाप प्रवाशांचा धोक्यात येणारा जीव पाहता, प्रशासनाने या घाटात मजबूत संरक्षक भिंती उभारणे, गतिरोधक व स्पष्ट दिशादर्शक फलक लावणे आणि रात्रीच्या प्रवासासाठी पुरेशी प्रकाश व्यवस्था करणे आता अत्यंत गरजेचे झाले आहे.

अरुंद घाट आणि खड्डे बनले जीवघेणे

​साकत घाटातील अत्यंत अरुंद रस्ता आणि जागोजागी पडलेले मोठे खड्डे आता वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. घाटातून एकाच वेळी दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास बाजूने जाण्यास जागा उरत नाही, त्यातच रस्त्यावरील खड्डे चुकवण्याच्या नादात चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटते. अरुंद रस्त्यामुळे येथे ओव्हरटेक करणे म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले असून, हेच खड्डे आणि अरुंद रस्ता निष्पाप प्रवाशांच्या अपघाताला कारणीभूत ठरत आहेत.

करमाळा ते पाटोदा राज्य महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील करमाळा ते जामखेड या ४० किलोमीटर कामाला सरकारने नुकतीच मंजुरी दिली आहे. ऊर्वरीत जामखेड – साकत – पाटोदा या दुसर्‍या टप्प्यातील कामाला तातडीने मंजुरी देण्याची मागणी जनतेतून जोर धरत आहे.