जामखेड टाइम्स वृत्तसेवा: करमाळा-जामखेड-साकत-पाटोदा राज्य महामार्ग क्रमांक ५६ च्या विकासासाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील करमाळा ते जामखेड या रस्त्याच्या कामासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे, अशी माहिती विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या दळणवळण विकासाला गती मिळणार आहे.

आशियाई विकास बँकेचे अर्थसहाय्य; ‘अमृत काल’ योजनेतून होणार कायापालट
महाराष्ट्र अमृत काल रस्ते विकास योजनेच्या पहिल्या टप्प्यात आशियाई विकास बँकेच्या (ADB) अर्थसहाय्यातून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्राधान्याने हाती घेण्यात येत आहे. याअंतर्गत करमाळा ते जामखेड या ४० किमी लांबीच्या जुन्या राज्यमार्गाचे १० मीटर रुंदीच्या दर्जेदार सिमेंट काँक्रीट रस्त्यात रूपांतर करण्यात येणार आहे. भविष्यात हा मार्ग करमाळा, जामखेड, अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड या जिल्ह्यांना अधिक सक्षमपणे जोडणारा मुख्य ‘विकासमार्ग’ ठरणार आहे.
सध्या अत्यंत खराब अवस्थेत असलेला हा जुना राज्यमार्ग मोठ्या प्रमाणावर वाहतुकीसाठी वापरला जातो. पोथरे, जवळा, नान्नज, बोर्ले, झिक्री यासारखी महत्त्वाची गावे या मार्गावर आहेत. तसेच ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त प्रसिद्ध पर्यटन व तीर्थक्षेत्र असलेले जवळा हे ठिकाण याच मार्गालगत असल्याने या रस्त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या रस्त्यावरून शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, दुग्ध व्यावसायिक, कृषी मालाची वाहतूक तसेच दैनंदिन प्रवाशांची मोठी वर्दळ असते. रस्ता खराब असल्याने आजवर नागरिकांना अनेक अडचणींचा आणि अपघातांचा सामना करावा लागत होता, आता या त्रासातून कायमची सुटका होणार आहे.
या ३०० कोटींच्या विशेष प्रकल्पाअंतर्गत केवळ रस्ता रुंदीकरण होणार नाही, तर इतर नागरी सुविधांवरही भर दिला जाणार आहे. पोथरे, जवळा, बोर्ले फाटा, नान्नज, झिक्री आणि पाडळी फाटा या गावांच्या हद्दीत तब्बल १४ मीटर रुंदीचा रस्ता तयार करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी आधुनिक बसथांबे आणि पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी सिमेंट काँक्रीटची मजबूत बांधीव गटारे निर्माण केली जाणार आहेत. त्यामुळे वाहतुकीला वेग आणि सुरक्षितता मिळणार असून परिसरातील व्यापार, शेती व रोजगाराला मोठी चालना मिळणार आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघात दळणवळणाच्या सुविधा दर्जेदार व्हाव्यात यासाठी रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यावर माझा नेहमी भर राहिला आहे. राज्य महामार्ग ५६ दर्जेदार व्हावा यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू होता. महायुती सरकारने या महत्त्वपूर्ण महामार्गाच्या गती दिली आहे. कर्जत-जामखेडच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या या महत्त्वपूर्ण महामार्गासाठी सरकारने ३०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. या ऐतिहासिक निर्णयासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचे कर्जत-जामखेड मतदारसंघातील जनतेच्या वतीने मनापासून आभार !