पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त चोंडीत स्वच्छता अभियान; कर्जतच्या सामाजिक संघटनांचा स्तुत्य उपक्रम, प्रा राम शिंदेंकडून स्वच्छता शिलेदारांचे कौतूक

जामखेड टाइम्स वृत्तसेवा: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या पवित्र जन्मभूमी असलेल्या चोंडी येथे कर्जतच्या सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने आज (२८ रोजी) भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण संवर्धनाचे कार्य करणाऱ्या या शिलेदारांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Cleanliness campaign in Chondi on occasion of Punyashlok Ahilyadevi Holkar Jayanti, commendable initiative by social organizations of Karjat, Ram Shinde praises cleanliness ambassadors

कर्जत शहर आणि परिसरात गेल्या काही वर्षांपासून पर्यावरण रक्षणाची एक मोठी चळवळ उभी राहिली आहे. २ ऑक्टोबर २०२० पासून सर्व सामाजिक संघटना, कर्जत यांच्या माध्यमातून सलग श्रमदानातून वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, स्वच्छता अभियान आणि विविध पर्यावरण पूरक कामे अविरतपणे सुरू आहेत. या चळवळीच्या माध्यमातून आत्तापर्यंत कर्जत शहर व परिसरात तब्बल दीड लाख रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले असून, केवळ झाडे न लावता त्यांचे अत्यंत जबाबदारीने संगोपन आणि संवर्धनही करण्यात आले आहे. ही चळवळ आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.

Cleanliness campaign in Chondi on occasion of Punyashlok Ahilyadevi Holkar Jayanti, commendable initiative by social organizations of Karjat, Ram Shinde praises cleanliness ambassadors

याच सामाजिक बांधिलकीतून आज २८ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंती निमित्त सर्व सामाजिक संघटनांचे शिलेदार अहिल्यादेवींची जन्मभूमी असलेल्या जामखेड तालुक्यातील चोंडी येथे एकत्र आले. जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण परिसरात मोठ्या उत्साहात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. दरवर्षी जयंतीनिमित्त हा उपक्रम राबवला जातो.

विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्याकडून कौतुक आणि सत्कार

स्वच्छता अभियान संपन्न झाल्यानंतर, विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांच्या निवासस्थानी या सर्व शिलेदारांचे मनापासून स्वागत करण्यात आले. यावेळी झालेल्या चहापान आणि विशेष चर्चासत्रादरम्यान, सभापती शिंदे यांनी कर्जतच्या सामाजिक संघटनांमार्फत सुरू असलेल्या पर्यावरण संवर्धनाच्या निस्वार्थ कार्याचे विशेष कौतुक करत सर्व शिलेदारांचा सत्कार केला. तसेच या चळवळीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Cleanliness campaign in Chondi on occasion of Punyashlok Ahilyadevi Holkar Jayanti, commendable initiative by social organizations of Karjat, Ram Shinde praises cleanliness ambassadors

प्रशासकीय आणि राजकीय प्रोत्साहन ऊर्जादायी

समाजासाठी आणि पर्यावरणासाठी निस्वार्थ भावनेने सुरू असलेल्या या कार्याला प्रशासकीय आणि राजकीय पातळीवरून मिळणारे असे प्रोत्साहन निश्चितच ऊर्जा देणारे आहे. भविष्यातही अधिक जोमाने आणि व्यापक स्वरूपात पर्यावरण संवर्धनाचे हे कार्य सुरू राहील, असा विश्वास सर्व सामाजिक संघटनांच्या शिलेदारांनी यावेळी व्यक्त केला.