जामखेड: सावरगाव हादरले, एकाच रात्रीत सहा ठिकाणी घरफोड्या, खरिप हंगामासाठी साठवलेल्या पैश्यांवर चोरट्यांनी मारला डल्ला !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड तालुक्यातील सावरगाव येथे एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर चोरट्यांनी शेतकऱ्यांच्या पैश्यांवर डल्ला मारल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चार ते पाच दरोडेखोरांच्या टोळीने धुमाकूळ घालत घरफोडी केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Jamkhed news)

सावरगाव प्रकरणात विश्वनाथ किसन सपकाळ यांच्या घरी दरोडेखोरांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील एक तोळे सोन्याचे दागिने आणि तब्बल १ लाख २० हजार रुपये रोख रक्कम लंपास केली. ही रक्कम खरीप हंगामासाठी बियाणे व खते खरेदी करण्यासाठी तसेच घरातील जागरण-गोंधळ कार्यक्रमासाठी जमा करून ठेवली होती. चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर सपकाळ कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून खरीप हंगामाच्या तोंडावर त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. (Karjat jamkhed news)
याच रात्री संदीप चिंचकर यांच्या घरालाही चोरट्यांनी लक्ष्य केले. येथून ५ ग्रॅम सोन्याचे दागिने व १५ हजार हजारावर दरोडेखोरांनी डल्ला मारला. तसेच कांताबाई आण्णा भांबे आणि शिवाजी आश्रु समुद्र यांच्या घरांचे दाराचे कोंडे तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र घरातील सदस्यांना जाग आल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. याशिवाय गावातील आणखी दोन ठिकाणी संशयास्पद हालचाली व चोरीचे प्रयत्न झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. या सर्व घटना बुधवारी मध्यरात्री ते पहाटे या काळात घडल्या.
सदर घटना समोर येताच संपूर्ण गावात मोठी खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. एकाच रात्रीत सहा ठिकाणी चोरी व चोरीचे प्रयत्न झाल्याने सावरगाव ग्रामस्थांनी पोलिसांच्या रात्र गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. “गावात एवढ्या मोठ्या प्रमाणावर चोरी होत असताना पोलिसांची गस्त नेमकी कुठे होती?” असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.