जामखेड टाइम्स वृत्तसेवा : माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त राबविण्यात येणारा वाचन प्रेरणा दिन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन ग्रंथालय विभागाच्या वतीने करण्यात आले होते.

“वाचन प्रेरणा दिन” औचित्य साधून “मराठी भाषेचा प्रचार व प्रसार” व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. पी. यू. भोसले हे होते.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा प्रचार व प्रसार यासाठी सक्रिय भूमिका घ्यावी असे मत मांडत भोसले यांनी भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच मराठी भाषेचा समृद्ध ऐतिहासिक वारसा, प्राचीनता, साहित्यिक परंपरा यावर भोसले यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
‘मराठी ग्रंथ प्रदर्शन’ व “मराठी भाषेचा प्रचार व प्रसार या विषयावर आयोजित व्याख्यानात व्याख्याते सचिन कदम यांनी तंत्रज्ञानाच्या युगात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करणे, वारशाचे जतन व संवर्धन करणे व पुढील पिढीपर्यंत मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे सांगत मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ती महाराष्ट्राच्या संस्कृतीची व विचार विश्वाची ओळख आहे.
नव्या पिढीने मराठीचा अभिमान बाळगून तिचा दैनंदिन जीवनात आणि डिजिटल माध्यमांमध्ये प्रभावी वापर केला पाहिजे, मराठी भाषेचा प्रचार व प्रसारासाठी महाविद्यालय विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा असे अवाहन कदम यांनी केले.
यावेळी प्रभारी ग्रंथपाल प्रा. पी. एस. पवार, डॉ. जी. के. वामन, डॉ. व्ही. एम. कुलकर्णी डॉ. एन. व्ही. लांडे, श्री.एस. पवार व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक ग्रंथपाल महादू शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. महाजन ए. वाय. यांनी तर डॉ. संदीप मोरे यांनी आभार मानले.