जळगाव रेल्वे अपघात : पुष्पक रेल्वे दुर्घटना का घडली ? रेल्वेला आग लागल्याची अफवा कोणी पसरवली? धक्कादायक खुलासा समोर
Jalgaon Railway Accident : जळगाव (पाचोरा) येथे बुधवारी सायंकाळी पुष्पक एक्स्प्रेस या रेल्वेतील प्रवाश्यांचा भीषण अपघात झाला. जळगाव रेल्वे अपघात दुर्घटनेत १३ प्रवाश्यांचा मृत्यू झाला आहे. तर ४० प्रवाशी जखमी झाले आहे आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने जारी केली आहे.पुष्पक रेल्वे दुर्घटना का घडली ? रेल्वेला आग लागल्याची अफवा कोणी पसरवली? याबाबत एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. (Pushpak Express Accident Latest News Today In Marathi)

जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ (Pardhade Railway Station) पुष्पक एक्स्प्रेस रेल्वेचा भीषण अपघात झाला. रेल्वेला आग लागल्याच्या अफवेनंतर प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी धावत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. याचवेळी समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्स्प्रेसने अनेकांना उडवलं. या भीषण अपघातात अनेक प्रवाश्यांच्या शरीराच्या अक्षरशा: चिंधड्या उडाल्या. तर काही प्रवाश्यांचे शीर धडावेगळे झाले.
जळगाव रेल्वे अपघातात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे तर जवळपास ४० जण गंभीर जखमी झाले आहेत.त्यात ९ पुरुषांचा तर ३ महिलांचा समावेश आहे. अपघातातील पाच जखमींवर पाचोऱ्याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर चार गंभीर जखमींवर वृदांवन या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
एका चहावाल्याने रेल्वेला आग लागल्याची अफवा पसरवल्याने तसेच एक्स्प्रेसची चैन आढल्यामुळे अपघाताची भीषण घटना घडल्याची धक्कादायक आता माहिती समोर आली आहे. चहावाला व चैन ओढणारा या दोघांचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. (Pushpak Express Accident Latest News Today In Marathi)
चहावाल्याने अफवा पसरवली आणि दुसऱ्या तरुणाने एक्सप्रेसची चैन खेचली
पाचोऱ्या उपचार घेत असलेल्या पाचही जखमींना भेटून पोलिसांनी त्यांचा जबाब घेतला आहे. घटना कशी घडली? नेमकं काय घडलं? याची माहिती पोलीसांनी जाणून घेतली या तपासातूनच चहावाल्याने एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरवल्याने ही दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. चहावाल्याने अफवा पसरवली आणि दुसऱ्या तरुणांने एक्सप्रेसची चैन खेचली.
त्यामुळे एक्सप्रेसने जोरात ब्रेक मारला. त्यामुळे चाकांमधून आगीच्या मोठमोठ्या ठिणग्या उडाल्या. त्यामुळे एक्सप्रेसला आग लागल्याच्या अफवेवर प्रवाशांचा विश्वास बसला आणि त्यांनी मागचा पुढचा विचार न करता धडाधड एक्सप्रेसमधून उड्या मारल्या. या सर्व घटनेला कारणीभूत असलेल्या चहावाला आणि चैन खेचणाऱ्याचा स्थानिक आणि रेल्वे पोलीस शोध घेत आहेत.
पाचोऱ्यातील रुग्णालयात जखमींना ठेवण्यात आलं आहे. त्यातील मोहरम अली हे अत्यंत जखमी झाले आहेत. मोहरम अली लखनऊवरून मुंबईला येण्यासाठी निघाला होता. मुंबईतील गोरेगावमध्ये तो काम करतो. पण या अपघातात तोही जखमी झाला आहे. त्यामुळे त्याच्यावर पाचोऱ्यातील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
त्याच्यासोबत आणखी चारजण याच रुग्णालयात उपचार घेत आहेत. पोलिसांनी मोहरम अली आणि इतरांचा जबाब नोंदवला आहे. आम्ही चौघे निघालो होतो. डब्यात आग लागून धूर आल्याने आम्ही रेल्वेतून उड्या मारल्या. त्यामुळे आम्ही जखमी झालो, असं मोहरम अलीने सांगितलं.
कुणाचा मामा तर कुणाचा भाऊ
गावखेड्यातून लखनऊवरून आम्ही पाच ते सात मित्र कामधंद्यासाठी शहरात जात होतो. आम्ही एक्सप्रेसमध्येच होतो. आग लागल्याची अफवा पसरली आणि आम्ही उड्या मारल्या. साडेपाच वाजता ही दुर्घटना घडली, असं एका प्रवाशाने सांगितलं. या दुर्घटनेत कुणाचा मामा तर कुणाचा भाऊ दगावला आहे. आगीची अफवा उडाल्याने प्रवासी रेल्वेतून उड्या मारू लागले. तिकडून एक्सप्रेस आली आणि सर्वांना उडवलं, असंही त्याने सांगितलं.
मृतांची डीएनए चाचणी होणार,
या अपघातातील मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू झालं आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. तसेच मयतांची डीएनए चाचणी करून त्यांची ओळख पटवली जाणार असल्याचंही स्पष्ट केलं.
दुसरीकडे रेल्वेने तातडीची मदत म्हणून मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख, गंभीर जखमींना 50 हजार, कायम अपगंत्व आलेल्यांना 2 लाख 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.
अजित पवारांनी सांगितला जळगाव रेल्वे अपघात घटनेचा घटनाक्रम
जळगाव रेल्वे अपघाताच्या घटनेची माहिती देताना अजित पवार म्हणाले, पुष्पक रेल्वे मुंबईच्या दिशेनं येत असताना पाचोऱ्याजवळ रसोई यान बोगीच्या चहा विक्रेत्याने आग लागली… आग लागली… अशा आरोळ्या दिल्या. या आरोळ्या ऐकून रेल्वेतून प्रवास करणाऱ्या उदलकुमार आणि विजयकुमार यांनी घाबरुन धावत्या रेल्वेतून उड्या मारल्या.
हा सगळा प्रकार बघून संपूर्ण बोगीत गोंधळ उडाला. आजुबाजुच्या बोगींमध्येही गोंधळ उडाला. सगळ्या बोगी एकमेकांना जोडलेल्या असतात. यावेळी काही प्रवाशांनी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी दोन्ही बाजुला उड्या मारण्याचा प्रयत्न केला. पण गाडीचा वेग जास्त होता. त्यामुळे प्रवासी गाडीतून उतरू शकले नाहीत. त्यामुळे एका प्रवाशाने चैन ओढली, त्यानंतर रेल्वे थांबली.
रेल्वे थांबताच प्रवासी दरवाजा आणि खिडकीतून खाली उतरू लागले. प्रवाशांनी खाली उतरल्यावर इकडं तिकडे जायला सुरुवात केली. दरम्यान, बेंगळुरूवरून नवी दिल्लीच्या दिशेनं जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने अनेक प्रवाशांना धडक दिली. यात अनेकांच्या शरीराची अक्षरश: दुर्दशा झाली, अशी माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.