बुलढाणा : खानदेश विदर्भ सीमेवर भीषण अपघात, तालसवाडा महामार्ग अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू तर अनेक जण जखमी
Buldhana Accident Today : खानदेश विदर्भ सीमेवर तालसवाडा महामार्गावर (Talaswada Highway Accident) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. तर अनेक जण जखमी झाले आहेत तर एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आलीय. या अपघातामुळे विदर्भ खानदेश महामार्गावर (Vidarbha Khandesh Highway) गेल्या दोन तासापासून वाहतुकीची कोंडी झाली आहे. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मदतकार्य सुरू केले आहे.
घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. टोलनाक्याच्या निष्काळजीपणामुळे एकतर्फी वाहतूक सुरू असल्याने अपघात घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. आठवड्याभरापासून रस्ता बंद करण्यात आलेला आहे. ६ महिने झालं पूल झालेला, मधेच रस्त्याला भगदाड पडले. त्यामुळे रस्ता बंद पडला, एक बाजू सुरू केली. त्यामुळे अपघात होत आहेत असा आरोप वाहनचालकांनी केला आहे.
चौपदरी रस्ता असून एकच बाजू सुरू आहे. पुलाला भगदाड पाडल्यानंतर कोणतेही बोर्ड लावलेले नाहीत. मातीचा ढिग टाकल्याने गाड्या उलटल्याचं वाहनधारकांनी म्हटलं. गेल्या ८-१० दिवसांपासून टोल चालु आहे पण एक साइड सुरू आहे. समोर समोर गाड्या येऊन अपघात होत आहेत. या सर्व अपघाताला प्रशासन जबाबदार आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.
राष्ट्रीय महामार्गावर अपघाताला इथला ठेकेदार जबाबदार आहे. तालसवाडा नळगंगा नदीवरचा पूल निकृष्ट दर्जाचा बांधला आहे. त्यावर खड्डा पडला असून त्यातून कार खाली पडली असती एवढं भगदाड पडलंय. तो खड्डा बुजवण्याचं काम सुरू आहे. तिकडचा एक मार्ग बंद करून एकाच बाजूने वाहतूक होत आहे. त्यासाठी कोणत्याही सूचना देणारे बोर्ड लावले नाहीत. फक्त मातीचे ढिग टाकले आहेत. त्यामुळे ट्रक एकमेकांवर आदळले असून ठेकेदारामुळेच हे अपघात झाले आहेत. ठेकेदारावर कारवाई व्हावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.