20 जूलैला होणार महाराष्ट्रातील राजकीय नाट्याचा सर्वोच्च फैसला

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : शिवसेना विरुद्ध शिंदे गट यांच्या लढाई आता निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. येत्या 20 जूलै 2022 रोजी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात मोठा फैसला होणार आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन व्ही रामण्णा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे.

शिवसेना आणि शिंदे गटाने सुप्रीम कोर्टात वेगवेगळ्या सात याचिका दाखल केल्या आहेत. शिवसेनेत निर्माण झालेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेने बंडखोर 17 आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. या सर्व याचिकांवर येत्या बुधवारी (20 जूलै 2022) सुनावणी होणार आहे.

महाराष्ट्रात निर्माण झालेल्या घटनात्मक पेचावर सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठ तयार करुन एकत्रित सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन व्ही रामण्णा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. त्रिसदस्यीय घटनापीठात सरन्यायाधीश एन व्ही रामण्णा, न्यायाधीश कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली यांचा समावेश आहे.

येत्या 20 जूलैला सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या या सुनावणीत कोर्ट काय फैसला देणार याकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष असणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचे भवितव्य ठरवणारा 20 जूलै हा दिवस असणार आहे. या दिवशी कोर्टात काय घडामोडी घडणार याची संबंध देशाला उत्सुकता लागली आहे.