अमृता फडणवीस म्हणतात, वेश्या व्यवसायाला प्रोफेशन म्हणून स्वीकारा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : समाजात वेश्या व्यवसायामुळे संतुलन राखलं जातं, सर्वोच्च न्यायालयाने देखील या व्यवसायाला पाठिंबा दिला आहे. तुमचा बचाव करण्यासाठी आम्ही आहोत. वेश्या व्यवसायाला जर्मनीत आदराने पाहिले जाते, आपल्याकडेही वेश्या व्यवसायाला प्रोफेशन म्हणून स्विकार करायला हवा, मी तुमच्या पाठीमागे उभी आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले.

भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या वतीने पुण्यामध्ये लालबत्ती भागांमध्ये राहणाऱ्या महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्या शिबिराचे उद्घाटन अमृता फडणीस यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात अमृता फडणवीस बोलत होत्या. (free health camp for prostitutes in Pune)

यावेळी पुढे बोलताना अमृता फडवणीस म्हणाल्या की, वेश्या व्यवसायामुळे समाजात संतुलन राखलं जात आहे. हा व्यवसाय पुराणकाळापासून आहे. तुम्ही कोणत्याही कारणामुळे या व्यवसायात पडला असला तरी, तुम्ही या समाजाचा अविभाज्य भाग आहात, तुमच्यावर कधी वाईट प्रसंग आला तर, आम्हाला हक्काने आवाज द्या, आम्ही तुमच्या मदतीसाठी सदैव तयार आहोत असेही यावेळी फडणवीस म्हणाल्या.

फडणीस पुढे म्हणाल्या की,समाजाचं संतुलन राखण्याचे काम तुमच्या हातून होत आहे, त्यामुळे तुम्हाला गर्व वाटला पाहिजे. पैशासाठी आणि गरीबीमुळे जरी तुम्ही या व्यवसायात आला असल्या, तरी देखील गर्वाचे काम करत आहात, असे म्हणत अमृता फडणवीस यांनी लालबत्ती भागात काम करणार्‍या महिलांना पाठिंबा दिला.

आपल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले पाहिजे, त्याचबरोबर मुलांच्या आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, वेश्या व्यवसायामुळे अनेक रोगांची बाधा होऊ शकते त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे,

आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, तुमच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी आम्हाला कधीही हाक द्या, आम्ही तुमच्या मदतीसाठी सदैव तयार आहोत. तुमचे आरोग्य चांगले राहावे यासाठी लवकरच या भागात योगाचा क्लास सुरू करण्यासाठी मी पुढाकार घेईल, असे यावेळी अमृता फडणीस यांनी सांगितले. याबाबतचे वृत्त एबीपी माझा ने दिले आहे.