महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट : राज्यातील 224 महसुल मंडळात नव्याने दुष्काळ सदृश्य स्थिती घोषित, अहमदनगर जिल्ह्यातील ‘इतक्या’ महसूल मंडळांचा समावेश !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रातील अनेक भागात यंदा पावसाने कमी हजेरी लावली.अनेक भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. यामुळे राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये पाणी टंचाईचे संकट गंभीर बनत चालले आहे. जानेवारी महिन्यापासून राज्यात दुष्काळाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पंधरवाड्यानंतर ही परिस्थिती अधिक गहिरी बनत चालली आहे. अश्यातच सरकारने राज्यातील 224 महसुल मंडळात दुष्काळ सदृश्य स्थिती घोषित केली आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक महसुल मंडळांचा समावेश आहे.

राज्यावर दुष्काळाचे सावट घोंघावू लागले आहे. शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न राज्यातील अनेक भागात निर्माण झाला आहे. सरकारने यापुर्वी राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. आता राज्यातील 224 महसुल मंडळात नव्याने दुष्काळ सदृश्य स्थिती जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय महसुल व वन विभागाने जारी केला आहे. राज्यातील दुष्काळ सदृश्य महसुल मंडळाची संख्या आता 1045 इतकी झाली.

जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. राज्यात या कालावधीत 75 टक्केपेक्षा कमी पाऊस झाला. यामुळे राज्यातील 40 तालुक्यातील 1021 महसुली मंडळांत दुष्काळसदृश स्थिती जाहीर करण्यात आली होती. पण या 1021 महसुली मंडळातून विभाजीत झालेली आणि लातूर जिल्हाधिकारी यांच्या प्रस्तावातील 224 महसुली मंडळातही घोषणा झाली नव्हती. त्यावर आता निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयात अद्याप पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आलेले नाही अशा देखील महसुली मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.

Drought on Maharashtra, Drought-like status declared in 224 revenue circles in Maharashtra, inclusion of 'so many' revenue circles in Ahmednagar district

राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने काढेलल्या शासन निर्णयात 19 जिल्ह्यातील नवे 224 मंडळांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या दुष्काळ सदृश्य मंडळात सर्व सवलती तातडीने लागू करण्यात आल्या आहेत. यात जमीन वसुलित सवलत, कृषी पंप, तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफीसह अनेक सवलती आहेत. यांचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन सरकारने केले आहे.

नव्या यादीत अहमदनगरमधील 34, धुळे 23 आणि जळगावमधील 24 दुष्काळग्रस्त मंडळांचा समावेश आहे. याबरोबरच पुणे 14, कोल्हापूर 05, सातारा 12, सांगली 02, सोलापूर 10, नाशिक 13, छत्रपती संभाजीनगर 16, जालना 03, नांदेड 05, हिंगोली 07, परभणी 13, बीड 19, वर्धा 03, नागपूर 05, धाराशिव 10, लातूर 06 अशी मंडळे आहेत. या महसुल मंडळात सरकारने दुष्काळ सदृश्य स्थिती घोषित केली आहे. याबाबतचे वृत्त अग्रोवनने दिले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. जामखेड तालुक्यात दुष्काळाच्या झळा तीव्र बनत चालल्या आहेत. अनेक भागात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनत चालली आहे. जामखेड तालुक्यात अजूनही टँकर सुरु करण्यात आलेले नाही. टँकर सुरु करावेत अशी अनेक गावांची मागणी आहे. टँकर कधी सुरु होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

shital collection jamkhed