‘दिदी आता सगळं सांभाळून घे… मम्मी-पप्पांना एकटं सोडू नको, मी जातोय’; रक्षाबंधनाच्या दिवशीच तरूणाने संपवली जीवनयात्रा
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : रक्षाबंधनाच्या दिवशी जळगाव शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अकरावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने आपली जीवनयात्रा संपवली आहे.आयुष्याचा शेवट करण्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर बहिणीसोबतचा फोटो पोस्ट करत, ‘आता सगळं सांभाळून घे दीदी. मम्मी-पप्पांना एकटं सोडू नको, जातो मी’, असा भावनिक संदेश लिहिला होता. रोहित साहेबराव धनगर (rohit sahebrao dhangar) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित जळगाव एमआयडीसी परिसरातील सिद्धीविनायक विद्यालयात अकरावीच्या कला शाखेत शिक्षण घेत होता. तो आई-वडील आणि लहान बहिणीसोबत राहत होता. त्याचे वडील एमआयडीसी परिसरात मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.
रक्षाबंधनानिमित्त रोहितची आई चोपडा तालुक्यातील असली येथे आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी गेली होती. दुसरीकडे, रोहितचे वडील रोहित आणि त्याच्या लहान बहिणीला घेऊन मेहरुण येथे आपल्या बहिणीकडे रक्षाबंधनासाठी गेले होते.
बहिणीकडून राखी बांधून घेतल्यानंतर रोहितने वडिलांची गाडी घेतली. ‘घरी जाऊन येतो’ असे सांगून तो जुना आसोदा रोड परिसरातील आपल्या घरी परतला होता.
घरी पोहोचल्यानंतर त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर बहिणीसोबतचा फोटो पोस्ट केला. त्यावर ‘हॅपी रक्षाबंधन’ असे लिहून बहिणीसाठी भावनिक संदेश ठेवला. ‘आता सगळं तू सांभाळून घे दीदी. मम्मी-पप्पांना कधीही एकटं सोडू नको, मी जातो आहे’, अशा आशयाचा निरोप त्याने दिला.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन गेमिंगसंदर्भातील माहितीही समोर येत आहे. रोहितने एका मित्राला व्हिडीओ पाठवला होता. त्यामध्ये ऑनलाइन गेमिंगमध्ये पैसे हरल्याचा उल्लेख केल्याची प्राथमिक माहिती आहे.
तसेच खात्यातून ३० हजार रुपये काढण्यासाठी पिन कोड टाकल्याचे त्याने मित्राला सांगितल्याचेही समोर आले आहे. सोमवारी घरी येणाऱ्या व्यक्तीला हे पैसे देण्याबाबत त्याने मित्राला निरोप दिल्याची माहिती आहे.
याशिवाय सोशल मीडियावर ठेवलेल्या आणखी एका स्टेटसमधूनही त्याच्या मनात काहीतरी गंभीर सुरू असल्याचा संशय मित्रांना आला. मात्र, रोहितने नेमक्या कोणत्या कारणामुळे टोकाचे पाऊल उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ऑनलाइन गेमिंगमधील आर्थिक नुकसान आणि या घटनेचा नेमका संबंध तपासानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे.
रोहितचे मेसेज आणि सोशल मीडिया स्टेटस मित्रांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना संशय आला. त्यामुळे काही मित्रांनी तातडीने त्याच्या घराकडे धाव घेतली. मित्र घरी पोहोचले असता रोहितने गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ त्याच्या वडिलांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी रोहितला शासकीय रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच धनगर कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. काही वेळापूर्वीच रक्षाबंधन साजरे करून बहिणीकडून राखी बांधून घेतलेल्या रोहितने त्याच दिवशी जीवन संपवल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रोहितचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्याच्या मूळगावी वर्डी (ता. चोपडा) येथे नेण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, या घटनेमागील नेमके कारण अधिकृत तपासातून स्पष्ट होणे बाकी आहे.