जामखेडमध्ये किराणा दुकान फोडणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात; २४ तासांत दोघांना अटक, दोघे फरार

जामखेड : शहरातील जय हिंद चौक परिसरात किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरी करणाऱ्या टोळीचा जामखेड पोलिसांनी अवघ्या २४ तासांत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी दोघे फरार आहेत. पोलिसांनी चोरीतील काही मुद्देमाल तसेच दुकानाचे शटर तोडण्यासाठी वापरण्यात आलेली लोखंडी कटावणी जप्त केली आहे.

Gang that broke into grocery store in Jamkhed falls into police net, two arrested within 24 hours, two absconding,

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ ते २७ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान जय हिंद चौकातील सचिन प्रोव्हिजन स्टोअर्स या किराणा दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातून सुमारे ५४ हजार १०० रुपये किमतीचे किराणा साहित्य चोरीला गेल्याचे समोर आले. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जामखेड शहर आणि परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली.

या कारवाईत करण अशोक पवार (वय २०) आणि अनिल गौतम काळे (वय १९) यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या चौकशीत या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी करण पवार याच्या घरातून ४ हजार ४७२ रुपये किमतीचा चोरीतील माल तसेच दुकानाचे शटर तोडण्यासाठी वापरण्यात आलेली लोखंडी कटावणी जप्त केली.

या गुन्ह्यात आणखी किरण ऊर्फ खंड्या रावसाहेब काळे आणि रोहित अशोक काळे, दोघेही रा. मिलिंदनगर, भुतवडा रोड, जामखेड, यांचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले असून ते सध्या फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक अजित मोरे, शिवाजी कदम, संजय लोखंडे, ईश्वर माने, गणेश ढोबळे, दीपक बोराटे, कुलदीप घोळवे, ज्ञानेश्वर बेल्हेकर आणि रत्नमाला हराळे यांच्या पथकाने केली.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय लोखंडे करीत आहेत.