PMC परीक्षेत ‘मुन्नाभाई’ पॅटर्न! चष्म्यात कॅमेरा, बाहेरून उत्तरं…? ३० मिनिटांत ९० प्रश्न अचूक!नेमकं प्रकरण काय?

जामखेड टाइम्स वृत्तसेवा: पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साध्या नजरेने सहज ओळखता येणार नाही अशा ‘कॅमेरा चष्म्या’च्या सहाय्याने संगणकावरील प्रश्नपत्रिका स्कॅन करून ती बाहेर पाठवण्यात आली आणि साथीदारांकडून मिळालेल्या उत्तरांच्या आधारे पेपर सोडवण्यात आल्याचा संशय आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एका परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडल्याचे पुणे महापालिकेच्या तांत्रिक पडताळणीत उघड झाले आहे.

pmc je exam hitech cheating camera glasses pune

या प्रकरणी तीन उमेदवारांसह त्यांना मदत करणाऱ्या पाच जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हायटेक कॉपीमागे स्पर्धा परीक्षांमध्ये सक्रिय असलेले मोठे रॅकेट आहे का, याचाही तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

पुणे महानगरपालिकेच्या 169 कनिष्ठ अभियंता पदांसाठी जवळपास 21 हजार उमेदवारांनी ऑनलाइन परीक्षा दिली होती. परीक्षा पार पडल्यानंतर निकाल जाहीर झाला आणि पुढील टप्प्यात कागदपत्रांची छाननी तसेच उमेदवारांच्या परीक्षेतील डिजिटल हालचालींची तांत्रिक तपासणी सुरू करण्यात आली.

याच तपासणीदरम्यान छत्रपती संभाजीनगरमधील चिखलठाणा येथील ‘आयकॉन डिजिटल झोन’ परीक्षा केंद्रावर परीक्षा दिलेल्या तीन उमेदवारांचा डेटा संशयास्पद आढळून आला. संबंधित उमेदवारांनी परीक्षेच्या सुरुवातीच्या सुमारे अर्ध्या तासात प्रश्न केवळ वाचून काढल्याचे तांत्रिक नोंदीत दिसून आले. त्यानंतर ते वॉशरूममध्ये गेले आणि परत आल्यानंतर परीक्षेच्या शेवटच्या अवघ्या 30 मिनिटांत त्यांनी 100 पैकी 90 हून अधिक प्रश्न अचूक सोडवल्याचे निदर्शनास आले.

या उमेदवारांच्या कामगिरीपेक्षाही त्यांची परीक्षा सोडवण्याची पद्धत अधिक संशयास्पद ठरली. संगणकावरील प्रश्नांची उत्तरे नोंदवताना त्यांनी माऊसचा वापर केल्याची नोंद लॉगशीटमध्ये आढळली नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाचा संशय अधिक बळावला.

या प्रकारानंतर पुणे महानगरपालिकेने केवळ संबंधित उमेदवारांचीच नव्हे, तर परीक्षेला बसलेल्या 20 हजारांहून अधिक उमेदवारांच्या डिजिटल हालचालींचा सखोल तांत्रिक तपास केला. तब्बल दीड महिना ही पडताळणी सुरू होती. परीक्षा केंद्रावरील संगणकीय लॉग, प्रश्न सोडवण्याची वेळ, उमेदवारांच्या हालचाली आणि त्यांच्या उत्तरांच्या पॅटर्नचा अभ्यास करण्यात आला.

प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, उमेदवारांनी चष्म्यामध्ये बसवलेल्या सूक्ष्म कॅमेऱ्याचा वापर करून संगणकाच्या स्क्रीनवरील प्रश्नपत्रिका स्कॅन केली. हे प्रश्न परीक्षा केंद्राबाहेर असलेल्या साथीदारांपर्यंत पोहोचवण्यात आले आणि त्यांच्याकडून मिळालेल्या उत्तरांच्या आधारे उमेदवारांनी पेपर सोडवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणात गजानन पाचे, अंकित वाघमारे यांच्यासह काही उमेदवार आणि परीक्षा केंद्राशी संबंधित व्यक्तींची नावे तपासात समोर आली आहेत. या गैरप्रकारात नेमकी कोणाची काय भूमिका होती, उपकरणे कुठून आणण्यात आली, परीक्षा केंद्रातील कुणाची मदत मिळाली का आणि अशाच पद्धतीने अन्य परीक्षांमध्येही गैरप्रकार करण्यात आला आहे का, याचा तपास सुरू आहे.

या प्रकरणाला दुजोरा देताना पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी संशयित उमेदवारांना भरती प्रक्रियेतून तत्काळ बाद करण्याची कारवाई सुरू असल्याचे सांगितले आहे. भरती प्रक्रियेची विश्वासार्हता कायम राखण्यासाठी दोषींविरोधात कठोर कारवाई केली जाईल, अशी भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली आहे.

दरम्यान, अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करून स्पर्धा परीक्षांमध्ये कॉपी करण्याची ही पद्धत केवळ या एका परीक्षेपुरती मर्यादित आहे की त्यामागे संघटित टोळी कार्यरत आहे, हा आता तपासाचा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. शिवाजीनगर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत असून पुढील चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.