ऐतिहासिक निर्णय: महाराष्ट्रातील या गावात प्रत्येक घरात लावला जाणार तुकाराम मुंडेंचा फोटो, ग्रामसभेचा एकमुखी ठराव
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : आपल्या कडक शिस्त, धडाकेबाज कार्यशैली चर्चेत असणारे डॅशिंग आयएएस अधिकारी तथा अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी आता सर्वसामान्य जनता भक्कमपणे उभी राहिली आहे. १५ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या एका ग्रामसभेत गावकऱ्यांनी घेतलेल्या एका आनोख्या निर्णयामुळे तुकाराम मुंडे देशात चर्चेत आले आहेत.

न्युज १८ लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार,जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा ग्रामपंचायतीने 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी आयोजित ग्रामसभेत एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता गावातील प्रत्येक घरात तुकाराम मुंडे यांचा फोटो लावला जाणार आहे.
21 वर्षांच्या प्रशासकीय सेवेत तब्बल 25 वेळा बदल्यांचा सामना करणाऱ्या तुकाराम मुंडे यांनी एफडीएच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून राज्यभरातील निकृष्ट दर्जाचे अन्न विकणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. कित्येक बेकायदेशीर आस्थापनांचे परवाने थेट रद्द किंवा निलंबित केले आहेत.
सर्वसामान्यांच्या ताटातील अन्न असो की औषध प्रत्येक गोष्ट भेसळमुक्त असावी यासाठी तुकाराम मुंडे यांनी कारवायांचा धडाका लावला आहे. यामुळे भेसळखोरांचे धाबे दणाणून गेले आहेत. या कारवायांमुळे मुंडे यांनी सर्वसामान्य जनतेच्या मनात आपले आगळे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
तुकाराम मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका कुऱ्हा ग्रामपंचायतीने घेतली आहे. स्वातंत्र्यदिनी पार पडलेल्या ग्रामसभेत तुकाराम मुंडे यांचे फोटो घराघरात लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरपंचांसह ग्रामस्थांनी सर्व नागरिकांना आपल्या घरात तुकाराम मुंडेंचा फोटो लावण्याचे जाहीर आवाहन केले आहे. शासकीय अधिकाऱ्याच्या समर्थनार्थ असा धाडसी आणि आगळावेगळा निर्णय घेणारी कुऱ्हा ही राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे.
तुकाराम मुंढेंच्या धडक कारवायांमुळे एकीकडे भेसळखोरांचे धाबे दणाणले असताना, दुसरीकडे सर्वसामान्य नागरिक स्वतःहून पुढे येत भेसळ रोखण्यासाठी सहकार्य करत आहेत. राजकीय दबाव आणि बदल्यांच्या सत्रामध्ये जनतेने दिलेला हा पाठिंबा राज्यभरात कौतुकाचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे. तुकाराम मुंडेंच्या कारवाईने भेसळखोरांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. मात्र दूध, पनीरमधील भेसळीविरोधात तुकाराम मुंढेंनी केलेल्या कारवाईचे राज्यभरातून स्वागत होत आहे. सोशल मीडियावर देखील कौतुक होत आहे.
ताज्या बातम्यांचे नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी इथे क्लिक करा