छत्रपतींचे स्वराज्य आणि वारकरी चळवळ

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा उत्साह महाराष्ट्रासह संपूर्ण देशांत ओसंडून वाहत आहे. त्यानिमित्ताने छत्रपतींच्या इतिहासाचे वेगवेगळ्या अंगांनी चिंतनही होईल. या महान इतिहासाचा सर्वांगांनी आढावा घेणे एका व्याख्यानात किंवा लेखात कुणालाही शक्य होणार नाही. अनेक इतिहासकारांना मोठमोठे ग्रंथ लिहून संपूर्ण शिवचरित्राला सर्वांगणाने न्याय देणे जमले आहे, असे म्हणता येणार नाही. प्रत्येकाने आपापल्या अंगांनी शिवचरित्र मांडले. काहींनी जाणीवपूर्वक त्याला वेगळे वळणही देण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज यांना एका धर्मापुरतेच मर्यादित करून त्यांचा इतिहास सांगताना जातीय आणि धार्मिक विस्तूष्ट निर्माण होईल, असे कारस्थानही काहींनी जाणीवपूर्वक केले. परंतु बहुजन समाजातून काही इतिहासकार पुढे आल्याने आता शिवचरित्र अधिक विस्ताराने आणि व्यापक स्वरूपात लोकांपर्यंत येत आहे.

Chhatrapati's Swaraj and Warkari movement, Author - Shamsunder Maharaj Sonnar,

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य घटक असलेली वारकरी चळवळ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचेही संदर्भ एकमेकांशी अत्यंत निगडीत असल्याचे दिसून येते. छत्रपतींच्या स्वराज्य स्थापनेमध्ये वारकरी संप्रदायाचे कळस म्हणून ओळखल्या जाणार्‍या तुकाराम महाराज यांचे योगदान मोठे असल्याचे आतापर्यंत अनेक इतिहासकारांनी मान्य केले आहे. परंतु त्याही पुढे जाऊन सांगायचे झाल्यास वारकरी संप्रदायाच्या पायाभरणीमध्ये स्वराज्याचा पाया घातल्याचे दिसून येते. या विधानाची सुसूत्र सांगड घालायची झाल्यास ज्या काळात नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, गोरोबाकाका यांनी वारकरी चळवळीचा पाया घातला तो कालखंड पाहिला पाहिजे. त्यातच आपल्याला स्वराज्याच्या स्थापनेचा विचारही दिसून येतो. आपण बाराव्या शतकातील तो कालखंड पाहिला तर संपूर्ण भारतवर्षावर परकीयांनी आक्रमन केलेले होते. फारच कमी स्थानिक राजे राज्य करीत होते. त्यात औरंगाबाद जवळील देवगिरीचा राजा रामदेवराय याचा समावेश होता.

पारतंत्रामध्ये जेव्हा देश जातो तेव्हा सामान्य जीवन जगणाऱ्या माणसांना त्याबद्दल फारसे वाईट वाटत नाही. परंतु जे विचारवंत असतात त्यांना मात्र पारतंत्र्याच्या बेड्या बोचू लागतात. परतंत्रामुळे आपल्या देशाचे, समाजाचे होणारे शोषण त्यांना दिसत असते. म्हणूनच बाराव्या शतकातील विचारवंत नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज, गोरोबाकाका, चोखोबा महाराज, यांना परतंत्राच्या या बेड्या बोचत होत्या. म्हणून नामदेव महाराजांनी तत्कालिन सर्व विचारवंताना एकत्र बोलाविले. या सर्व संतांनी एकत्र येऊन, आपण परतंत्रात का गेलो, याचा विचार सुरू केला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, आपला समाज संघटीत नव्हता. जो समाज संघटीत नसतो, तो दुर्बळ असतो आणि जो समाज दुर्बळ असतो त्या समाजावर दुसरा समाज आक्रमण करीत असतो. आपण संघटीत नसल्यामुळे दुर्बळ झालो. म्हणून परतंत्रात गेलो, असा निष्कर्ष काढण्यात आला. मग संघटीत का राहिलो नाही याचा विचार केला असता असे लक्षात आले की, इथे जात, धर्म, पंथ, वर्ण यामाध्यमातून समाजांची विभागणी केली होती. जातीव्यवस्थेच्या भिंती अत्यंत मजबूत होत्या. त्यामुळे समाज मोठ्या प्रमाणात दुभंगला होता. दुसरीकडे कर्मकांडात अडकल्यामुळे तो मोठ्या प्रमाणात आर्थिक दृष्ट्याही दुबळा झालेला होता, हे पंढरपूरात जमलेल्या त्या संतांच्या चिंतनातून वास्तव पुढे आले.

देशाला स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर जाती व्यवस्थेमुळे निर्माण झालेली दरी दूर केली पाहिजे, असा विचार पुढे आला. त्यातून मग नामदेव महराज यांनी पूर्वी एका व्यक्तीने ज्ञान सांगण्याच्या कीर्तन परंपरेला फाटा देऊन सामोहिक कीर्तन परंपरा सुरू केली. त्यातून सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र येण्याची हाक दिली.

या रे या रे लहान थोर। याती भलते नारी नर॥

लहान, थोर, स्त्री – पुरुष हे सर्व भेद विसरून एकत्र येण्याची हाक दिली. त्याच वेळी यज्ञयागादी धार्मिक उपक्रमातून होणारे आर्थिक शोषण थांबविण्यासाठी सोपा भक्तीचा मार्ग समाजाला उपलद्ब करून दिला. पंढरीच्या वारीतून सामाजिक संघटन करीत असतानाच त्याच वेळी कर्मकांडातून मुक्तीसाठी प्रयत्न केले. सर्व कर्मकांडाला पर्याय म्हणून बिनाखर्चाचे भंगवतांचे नाव हे माध्यम दिले. पंढरीच्या वारीच्या माध्यमातून सर्व जाती-धर्मांना एकत्र येण्यासाठी व्यासपीठ निर्माण करून दिले. त्यानंतरच्या पिढीमध्ये एकनाथ महाराजांनी सामाजिक समतेची चळवळ आपल्या भारुडाच्या माध्यमातून अधिक व्यापक केली.

सोळाव्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ सुरू होती. त्याच काळात संत तुकाराम महाराज यांनी पुणे परगण्यात कीर्तनाच्या माध्यमातून तरुणांमध्ये स्वराज्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. इतकेच नव्हे तर स्वराज्य स्थापनेच्या मोहीमेत तरुणांनी सहभागी व्हावे यासाठी तुकाराम महाराज यांनी शौर्याच्या गाथा सांगणारे कीर्तन मावळ प्रांतात केले. त्यासाठी पायीकीचे अभंग त्यांनी लिहिले. या अभंगात सैनिक कसा असला पाहिजे, त्याने आपल्या राज्यासाठी कसे लढले पाहिजे. याचे मार्गदर्शन केले. त्यातून छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण भरती होऊ लागले. भरती झालेल्या सैनिकांना तुकाराम महाराजांनी मार्गदर्शन केले की, स्वराज्याच्या पुढे आपला प्राण सुद्धा देण्याची तयारी ठेवली पाहिजे. बाण आणि गोळ्या अंगावर झेलण्याची धमक असली पाहिजे.

येता गोळ्या बाण साहिले भडमार। वर्षता अपार वृष्टी वरी॥स्वामीपुढे व्हावे पडता भांडण। मग त्या मंडन शोभा दावी॥

म्हणजे आपला राजा लढत असताना सैनिकांनी त्याच्या पुढे जाऊन आपला पराक्रम दाखविला पाहिजे.अशा सैनिकालाच खरा सन्मान मिळतो. जे फक्त पगारासाठी सैन्यात भरती होतात, ते रणांगणातत कुचराईपणा करतात. त्यांच्यावर राजाची कधीच मर्जी बसत नाही. असे अकरा अभंगातून मार्गदर्शन केलेले आहे. तुकाराम महाराज यांची किर्ती ऐकून छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला आले तेव्हा तुम्ही राज्य सांभाळा, आम्ही समाजाला मार्गदर्शन करू, असे तुकाराम महाराजांनी सांगितले होते. राजांनी धन देऊ केले, तेव्हाही या धनाची मला नव्हे तर स्वराज्याला गरज आहे, म्हणून ते धन परत पाठविले. तुकाराम महाराज यांनी तरुणांच्या मनात स्वराज्याचा अभिमान निर्माण केल्यामुळेच पहिल्या फळीतील सैनिक तयार झाले आणि त्याचा स्वराज्याला उपयोग झाला.

ज्यावेळी आपला देश परतंत्रात गेला होता, तेव्हा ज्ञानदेवे रचिला पाया आणि जेव्हा छत्रपतींचे स्वराज्य निर्माण झाले. तेव्हा तुका झालासे कळस. यावरून वारकरी संप्रदायाची पायाभरणी करण्या मागे, स्वराज्य निर्मिती हेच ध्येय होते, असे म्हणण्यास मोठा वाव आहे. वारकरी संतांनी दिलेल्या समतेच्या मंत्रांतून छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरा पगड जातींना बरोबर घेऊन स्वराज्य स्थापन केले. आता तोच विचार समाजात रुजविण्यासाठी खऱ्या शिवभक्तांनी आणि हरीभक्तांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. – लेखक – शामसुंदर महाराज सोन्नर