मोठी बातमी : शिवसेनेच्या माजी मंत्र्याची ठाकरे गटातून हकालपट्टी, उध्दव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याआधीच राजकीय उलथापालथ !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । 22 ऑक्टोबर 2022 । महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात रोज नाट्यमय घडामोडी घडत आहेत. उध्दव ठाकरे विरूद्ध एकनाथ शिंदे या दोन नेत्यांमधील संघर्ष तापलेला आहे. अश्यातच मराठवाड्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उध्दव ठाकरे हे मराठवाडा भागाच्या दौर्‍यावर येण्याआधीच शिवसेनेच्या माजी मंत्र्याची शिवसेनेतून हकालपट्टी करण्याची घोषणा करण्यात आलीयं. या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Big news, Former Minister Jayadutt Kshirsagar expelled from Shiv Sen Thackeray group, political upheaval before Uddhav Thackeray's visit to Marathwada, beed latest news

मराठवाड्यातील दिग्गज नेते तथा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे, तशी घोषणा शिवसेनेचे बीड जिल्हा संपर्कप्रमुख धोंडीराम पाटील यांनी केली. शिवसेनेच्या या कारवाईमुळे बीडसह मराठवाड्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

यावेळी बोलताना धोंडिराम पाटील म्हणाले की, जिल्ह्यात शिवसेनेचं काम करत असताना क्षीरसागर यांनी कुठल्याही कार्यक्रमात उध्दव ठाकरे यांचा फोटो लावला नाही. मुंबईत कधी त्यांची भेटही घेतली नाही. नुकत्याच झालेल्या उद्घाटन सोहळ्यात उद्धव ठाकरे याचं नावही घेतलं नाही. ही खंत वाटल्याने क्षीरसागर यांची हकालपट्टी करण्यात आल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा आणि जयदत्त क्षीरसागर यांचा कुठलाही संबंध नाही असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

मागील आठवड्याभरापासून मराठवाड्यामध्ये झालेल्या पावसाने कापूस आणि सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. परंतु शेतकऱ्यांना ठोस मदत झाली नाही. आता शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरणार आहे. शिवसेनेतल्या बंडानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच महाराष्ट्र दौरा करणार आहेत. मात्र त्याआधीच बड्या नेत्याची हकालपट्टी झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी अशी ओळख असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनी 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेतून प्रवेश केला होता. राष्ट्रवादीत असताना त्यांनी अनेक महत्वाच्या खात्यांचे मंत्रीपद भूषवले आहे.बीडसह मराठवाड्याच्या राजकारणात क्षीरसागर कुटुंबाला महत्वाचे स्थान आहे.

बीड जिल्ह्याच्या राजकारणावर क्षीरसागर कुटुंबाचे अनेक वर्षे वर्चस्व राहिलेले आहे. 2019 च्या निवडणुकीत काका विरूद्ध पुतण्या अशी लढाई झाली.त्यात काकांचा पराभव करत संदिप क्षीरसागर यांनी विजय मिळवला होता. पराभवानंतर जयदत्त क्षीरसागर हे शिवसेनेत जास्त सक्रीय नव्हते

दरम्यान, शिवसेनेचे बीड जिल्हा संपर्कप्रमुख धोंडीराम पाटील यांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हकालपट्टीची घोषणा केली असली तरी, उध्दव ठाकरे यावर काय निर्णय घेणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे, दरम्यान जयदत्त क्षीरसागर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात आहे. क्षीरसागर हे दिवाळीत धमाका करणार का ? याकडे बीड जिल्ह्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे.