मोठी बातमी : केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा फैसला, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे तर बाळासाहेबांची शिवसेना नावावर शिक्कामोर्तब !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्ष शिगेला पोहचलेला असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने चिन्ह आणि नावाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.  उध्दव ठाकरे गटाला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे हे तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले आहे.  मात्र चिन्हा बाबत धार्मिक कारण देत दोन्ही गटाला धक्का दिला आहे.

Big news,  big decision of Central Election Commission of India, Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray and Balasahebanchi shiv sena name is stamped

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकदा शिंदे यांच्या गटांमध्ये सध्या निवडणूक आयोगाच्या कोर्टात वाद सुरू आहे .दोन्ही गटांनी शिवसेनेवर दावा केल्याने निवडणूक आयोगाने अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष चिन्ह आणि पक्षाचे नाव वापरण्यास दोन्ही गटांना तात्पुरती बंदी घातली आहे.

या निवडणुकीसाठी दोन्ही गटांनी आपल्या गटांसाठी नाव आणि चिन्ह कोणते असावे याबाबत निवडणूक आयोगाला आज दुपारपर्यंत पर्याय देण्याचे निवडणूक आयोगाने सांगितले होते. त्यानुसार दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे पर्याय सादर केले होते.

अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने त्रिशूळ, उगवता सुर्य आणि मशाल या तीन चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. तर शिंदे गटाने त्रिशूळ, गदा आणि उगवता सुर्य ही चिन्ह निवडणुक आयोगाकडे पाठवली होती.

मात्र निवडणुक आयोगाने आता ‘त्रिशूळ’ आणि ‘गदा’ चिन्ह बाद करत दोन्ही गटाला पुन्हा मोठा धक्का दिला आहे. धार्मिक चिन्ह असल्याचे म्हणत आयोगानं ही दोन्ही  चिन्ह नाकारली आहेत.

यानंतर निवडणुक आयोगाने उद्धव ठाकरे यांना ‘मशाल’ हे चिन्ह दिले आहे. तर शिंदे गटाला चिन्हासाठी तीन पर्याय देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी ‘त्रिशूळ’ या चिन्हाची मागणी केली होती. मात्र हे चिन्ह धार्मिक असल्याचे म्हणत निवडणूक आयोगाने वापरास परवानगी नाकारली.

तसेच उगवता सूर्य हे तामिळनाडूमधील पक्षाचे चिन्ह असल्याचे जाहीर करत हे चिन्ह देखील वापरता येणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. यामुळे ठाकरे गटाला तिसरा पर्याय म्हणून मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे. तर शिंदे गटाला चिन्हांसाठी तीन नवे पर्याय देण्याचे निर्देश दिले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ठाकरे आणि शिंदे गटाकडून आज नाव चिन्हांची यादी सादर करण्यात आली आहे. या यादीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना बाळासाहेबांची अशी तीन नावे पर्याय म्हणून निवडणूक आयोगाकडे दिले होते.

तर ठाकरे गटाकडून शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे हे तीन पर्याय देण्यात आले होते.

निवडणूक आयोगाने शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिले आहे. तर ठाकरे गटाला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिले आहे.