बिग ब्रेकिंग : जामखेड पोलिसांवर टोळक्याने रोखली बंदूक, फायर होणार तोच.. बचावासाठी पोलिसांनी केला गोळीबार, मध्यरात्री रंगला गोळीबाराचा थरार, जामखेड तालुक्यात उडाली मोठी खळबळ !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : तिघा तरूणांनी जामखेड पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यावेळी पोलिसांची अन् आरोपींची झटापट झाल्याने दोन पोलिस जखमी झाले आहेत. या घटनेत स्व संरक्षणासाठी जामखेड पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. ही सिनेस्टाईल थरारक घटना मंगळवारी मध्यरात्री जामखेड शहरात घडली. या प्रकरणात जामखेड पोलिस स्टेशनला तिघा जणांविरूध्द दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आहे.(Jamkhed Crime News today)
याबाबत सविस्तर असे की, जामखेड शहरातील एका तरूणाच्या डोक्याला बंदूक लावत त्याच्याकडील इर्टिका गाडी बळजबरीने घेवून जाणाऱ्या तिघा जणांच्या टोळक्याला पेट्रोलिंग वर असलेल्या जामखेड पोलिसांच्या पथकाने अडवण्याचा प्रयत्न केला असता, सदर टोळक्याने गावठी कट्ट्यातून जामखेड पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्याचा दोनदा प्रयत्न केला. परंतू सुदैवाने फायर झाला नाही. यावेळी पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी पोलिसांच्या बचावासाठी सतर्कता दाखवत आरोपींच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात एका आरोपीच्या पायावर गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे. त्याच्यावर अहमदनगर येथे उपचार सुरु आहेत.
या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला 1) प्रताप ऊर्फ बाळा हनुमंत पवार, वय-30 वर्षे, 2) शुभम बाळासाहेब पवार, वय 21 वर्षे, 3) काकासाहेब उत्तम डुचे, वय 21 वर्षे सर्व रा. सारोळा ता. जामखेड जि. अहमदनगर यांचे विरुध्द भा.द.वि. कलम 307, 353, 332, 34 तसेच भारतीय हत्यार कायदा सन 1959 चे कलम 3/25 व 28 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जखमी आरोपी प्रताप उर्फ बाळा पवार हा अभिलेखवरील आरोपी असून त्याच्यावर जबरी चोरी, दरोडा व अग्निशस्र हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे नोंद आहेत
जामखेड पोलीस ठाणे हद्दीमध्ये पोलिस निरीक्षक महेश पाटील व जामखेड पोलिसांची पथक रात्र गस्तीवर असताना जामखेड येथील अर्बन बँक समोर , तपणेश्वर रोड, जामखेड या ठिकाणी अदनान शेख व प्रज्वल पालवे या तरूणांनी पोलिस गाडी थांबवत आरोपी प्रताप पवार याने अदनान शेख याच्या डोक्याला पिस्टल लावून जीवे ठार मारण्याची धमकी देत त्याच्या ताब्यातील MH 12 KT 4795 ही गाडी बळजबरीने घेवून गेला. गाडी घेऊन जात असताना आरोपी प्रताप पवार याच्या सोबत असलेल्या 2 अनोळखी साथीदारांनी अदनान याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याची माहिती पोलिसांना दिली.
यावेळी पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी अदनान शेख व प्रज्वल पालवे या दोघांकडे अधिक माहिती घेतली असता सदर गाडीस जीपीएस सिस्टीम असल्याचे पोलिसांना समजले. जीपीएस सिस्टीमवरून सदर गाडीचा शोध घेतला असता पोलिसांना सदर गाडी ही सारोळा रोड परिसरात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
अदनान शेख याची गाडी घेऊन गेलेल्या आरोपांकडे पिस्टल असल्याने जामखेड पोलिसांनी अधिकची कुमक मागवून घेत आरोपींचा शोध सुरु केला. सारोळा रोडवरील क्रिकेट मैदान परिसरात सदर वाहन पोलिसांना मिळून आले. परंतु आरोपी मिळून आले नाहीत.
जामखेड पोलिसांच्या पथकाने सदर आरोपींचा खर्डा रोड भागात शोध घेतला असता सदर आरोपी साई हाॅटेल येथे पोलिसांना मिळून आले. यावेळी जामखेड पोलिसांनी सदर आरोपींना पोलिसांच्या स्वाधीन होण्याचे अवाहन केले असता दोघा अनोळखी आरोपींवर पोलिसांवर हल्ला चढवला. पोलिसांशी झटापट केली. यावेळी आरोपी प्रताप उर्फ बाळा पवार याने त्याच्याकडील पिस्टल पोलिसांचे दिशेने रोखून गोळी फायर करण्याचा प्रयत्न केला.
सदरवेळी पोलिस पथक व फिर्यादी यांच्या जीवितास तात्काळ मृत्यू येण्याइतपत धोका निर्माण झाल्याने पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी शासकीय सर्विस रिवाल्वर मधून आरोपी प्रताप उर्फ बाळा पवार यांचे पायाचे दिशेने 1 गोळी फायर केली. यात आरोपी प्रताप पवार हा आरोपी जखमी झाला. त्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना झडप घालून तातडीने ताब्यात घेतले.
त्यानंतर जखमी आरोपी प्रताप ऊर्फ बाळा पवार याच्यावर जामखेड ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जामखेड पोलीस स्टेशन गु.र.न.324/2023 भा द वी कलम 392 ,504,506,34 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे फिर्यादी अदनान जहुर शेख रा.तपनेश्वर रोड, जामखेड व जामखेड पोलीस स्टेशन गु र न 325/2023 भा द वी कलम 307, 353,332, भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 28 प्रमाणे पोलीस नाईक संतोष कोपनर यांनी फिर्याद दिली आहे.
सदर पथकात पोलीस निरीक्षक महेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती, पोलीस नाईक अविनाश ढेरे, संतोष कोपणर, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश मांडगे, गणेश भागडे, देविदास पळसे, कुलदीप घोळवे, चालक हवालदार भगवान पालवे असे पथकात सामील होते.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडे,व पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती करीत आहेत
प्रताप ऊर्फ बाळु हनुमंत पवार वय-30 वर्षे विरुद्ध नोंद गुन्हे
1) जामखेड पो.स्टे 30/2019 भादवि क 394,427
2) दत्तवाडी पो.स्टे पुणे 3063/2017 मुं.पो.ॲक्ट क 37(1),(3),135
3) किनगाव पो.स्टे लातुर 51/2016 भादवि क 395
4) रेनापुर पो.स्टे लातुर 114/2016 भादवि क 395, आर्म ॲक्ट क 3/25.
5) किनगाव पो.स्टे लातुर 51/2015 आर्म ॲक्ट क 3/25