9 मिनिटांत 20 किलोमीटर अन् खेळ खल्लास, अतिवेगाने घेतला उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा बळी

मुंबई: खरं तर वेगावर नियंत्रण ठेवा, वाहतुकीचे नियम पाळा हे सातत्याने बोलले जाते, पण याकडे दुर्लक्ष होते. यातूनच मग हकनाक जीव गमवावा लागतो, याचाचे बोलके उदाहरण म्हणजे टाटा समुहाचे माजी अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा रस्ते अपघातात झालेला मृत्यू हा होय !

सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज गाडीने 9 मिनिटांत 20 किलोमीटर अंतर पार केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे सायरस मिस्त्री यांच्या मर्सिडीज गाडीचा वेग किती असेल याची कल्पना न केलेली बरी. सायरस मिस्त्री हे अतिवेगाचा बळी ठरले आहेत. सीट बेल्ट न लावल्याने एअर बॅग उघडल्या नाहीत. त्यामुळेच सायरल मिस्त्री यांना आपला जीव गमवावा लागला.

गुजरातहून मुंबईकडे येत असताना पालघर-चारोटी परिसरातील सूर्या नदीच्या पुलावर सायरस मिस्त्री यांची भरधाव मर्सिडिज कार दुभाजकाला धडकली आणि भीषण अपघात झाला. यात त्यांच्यासह सहकारी जहांगीर पंडोले यांचाही मृत्यू झाला. पोलिसांनी महामार्गावरील सीसी टीव्ही कॅमेर्‍यांची तपासणी केली. सायरस मिस्त्री यांची कार चारोटी चेकनाक्यावरून पुढे जाताच तत्काळ गाडीचा वेग मोठय़ा प्रमाणावर वाढला. केवळ 9 मिनिटात 20 किलोमीटर अंतर कापल्याचे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात दिसून आले. त्यामुळे चालकाच्या चुकीमुळे हा अपघात घडला असावा, असा पोलिसांना दाट संशय आहे.

पोलीस महानिरीक्षकांनी केली घटनास्थळाची पाहणी

सायरस मिस्त्री व जहांगीर पंडोले हे कारमध्ये मागील बाजूस बसले होते. त्यांनी सीट बेल्ट लावला नव्हता. मात्र चालक डॉ. अनाहिता पंडोल व त्यांचे पती दारियास पंडोल यांनी सीट बेल्ट लावल्याने दोघेही बचावले. दरम्यान, कोकण परिक्षेत्राची पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी अपघात स्थळाची आज पाहणी केली असून आरटीओच्या अधिकाऱयांनी देखील अपघातग्रस्त गाडीची तपासणी केली.

कारमध्ये सीट बेल्ट जरुर लावेन, शपथ घ्या!

सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर उद्योजक आनंद महिंद्रा यांनी सोमवारी ट्विटरवरून सर्वांना भावनिक आवाहन केले. मी कारमध्ये मागच्या सीटवर बसलो असतानाही नेहमीच सीट बेल्ट लावतो. तुम्हा सर्वांनाही विनंती करेन की कारमध्ये सीट बेल्ट जरुर लावेन, अशी शपथ घ्या, असे ट्विट त्यांनी केले आहे.