जामखेड : आमदार राम शिंदेंकडून विधानपरिषदेत रोहित पवारांची पोलखोल, शिंदे यांच्या आरोपाने राज्याच्या राजकारणात भूकंप, उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिले चौकशीचे आदेश !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील खंडाळा आणि पाटेगाव भागात जमिनी घेतलेल्या निरव मोदींसह अनेक बड्या धेंड्यांच्या नावांचा पाढा आमदार प्रा राम शिंदे विधानपरिषदेत वाचल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आमदार राम शिंदे यांनी केलेल्या आरोपांची शासनाने गंभीर दखल घेतली. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पाटेगाव व खंडाळ्यातील जमिनीबाबत चौकशी करण्याची घोषणा केली.यामुळे कर्जत जामखेड मतदारसंघातील एमआयडीसी प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.एमआयडीसी वरून आमदार रोहित पवारांनी हाती घेतलेला लढा बेरोजगारांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी नसून उद्योजकांसाठी सुरु असल्याचा मुद्दा मतदारसंघात चर्चेत आला आहे.

महाराष्ट्र विधानपरिषद नियम 97 नुसार आमदार राम शिंदे यांनी आज विधान परिषदेमध्ये कर्जत आणि जामखेड या दोन तालुक्यातील औद्योगिक वसाहतींच्या संदर्भामध्ये अभ्यासपूर्ण मांडणी केली. दोन्ही तालुक्यात औद्योगिक वसाहतींबाबत सरकारला कठोर प्रश्न विचारले. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाचे गंभीर मुद्दे उपस्थित केले. आमदार राम शिंदे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यांमध्ये एमआयडीसी सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले.

त्याचबरोबर खंडाळा आणि पाटेगाव येथे एमआयडीसी व्हावी या संदर्भामध्ये सुरु असलेल्या पाठपुराव्यात अनेक त्रुटी असल्याची बाब सामंत यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. विधान परिषदेत झालेल्या चर्चेत आमदार राम शिंदे यांनी नीरव मोदीच्या जागेत एमआयडीसी होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. याची चौकशी करण्याची घोषणा केली. राहिलेल्या परवानग्या मिळाल्यावरच कर्जत एमआयडीसीचा निर्णय घेऊ असे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिले.

Jamkhed, Rohit Pawar's polekhol in Legislative Council by MLA Ram Shinde, Earthquake in state politics due to Shinde's accusation, Industries Minister Uday Samant ordered an inquiry,

यावेळी सभागृहात बोलताना आमदार प्रा राम शिंदे म्हणाले, जामखेड तालुक्यात 25 वर्षांपुर्वी जामखेड औद्योगिक वसाहत मंजुर झाली. त्यासाठी 19.72 हेक्टर जागा संपादित केली. परंतू शासनाचे तेव्हापासून दुर्लक्ष झाले. जामखेड औद्योगिक वसाहतीत उद्योग धंदे सुरु व्हावेत यासाठी मी आमदार, मंत्री, पालकमंत्री असताना सातत्याने पाठपुरावा केला पण शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. आजतागायत त्या भूसंपादन केलेल्या एमआयडीसीत कुठलेही उद्योग उभे राहिले नाहीत. कुठेही बेरोजगारांच्या हाताला काम मिळालं नाही, शासनाने जर औद्योगिक वसाहत करायची ठरवलीच आहे तर मग अजून उद्योग का सुरु झाले नाहीत? असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला.

सध्या कर्जत येथे एमआयडीसीची सातत्याने मागणी होत आहे. पण या संदर्भामध्ये मी विधानसभेचा लोकप्रतिनिधी असताना 27 एप्रिल 2016 मध्ये तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे बैठक घेतली. तेव्हा माळढोक आरक्षणचा मुद्दा आला होता. सिद्धटेक अंतर्गत देऊळवाडी येथे जागा उपलब्ध होऊ शकते.तिथे एमआयडीसी व्हावी याबाबत या बैठकीत निष्कर्ष झाला. त्यानंतर तत्कालीन उद्योग राज्य मंत्री प्रविण पोटे यांच्यासोबतही कर्जत एमआयडीसीबाबत बैठक घेतली होती. पण पुढे काहीच कार्यवाही झाली नाही, असे शिंदे म्हणाले.

परंतू गेल्या महिन्यातं सोशल मीडियावर मी असं वाचलं की, कर्जत एमआयडीसीत जिंदाल स्टील’चे CMD सज्जन जिंदाल, TPCL कंपनीचे मालक साकेत कनोरीया, एशियन पेंट्स अमित चोक्सी, अदाणी हे उद्योग आणणार आहेत, त्यांच्याबरोबर लोकप्रतिनिधींनी चर्चा केल्याचं ट्विट मी वाचलं, कर्जतची एमआयडीसी मंजुर होणं अजून प्रलंबित आहे. मग तीन वर्षांत लोकप्रतिनिधींना जामखेडचा रस्ता का दिसला नाही? तिथं काय नवीन रोजगार पाहिजे असलेले तरूण मिळत नव्हते का ? बेरोजगारांच्या हाताला काम मिळणे अपेक्षित नव्हतं का? एवढ्या मोठ्या उद्योजकांशी चर्चा झाली मग जामखेड औद्योगिक वसाहतीत उद्योग का आणले नाहीत? आता या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे.

कर्जत आणि जामखेडमध्ये एमआयडीसी झाली पाहिजे इथपर्यंत बरोबर आहे, पण लोकप्रतिनिधींकडून सातत्याने घाट घातला जातोय की, एकाच ठिकाणी आणि याच ठिकाणी ही एमआयडीसी झाली पाहिजे.हा जर आग्रह असेल आणि त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांची जर नावं वाचली तर ही एमआयडीसी नेमकी कोणासाठी केली जातेय, कश्यासाठी करणार आहेत, हा उद्देश झाकून राहिल्याशिवाय राहत नाही, असे म्हणत आमदार प्रा.राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांची पोलखोल केली.

जामखेडची एमआयडीसी आजपर्यंत का होऊ शकली नाही, कर्जतच्या एमआयडीसीला कधी मंजुरी देणार आहेत? ती कोणत्या ठिकाणी होणार आहे? याचं उत्तर उद्योग मंत्र्यांनी द्यावं. कर्जत तालुक्यात गरीब शेतकरी आहेत. कवडीमोल किमतीने गुंतवणूकदारांनी इथल्या शेकडो एकर जमिनी घेतल्या आहेत. आपण देखील ती नावं ऐकुन आवाक् होणार,कोण शेतकरी आहेत? कर्जतमध्ये असे नवीन शेतकरी कुठून आले ? असा सवाल आमदार प्रा राम शिंदे यांनी उपस्थित केला.

खंडाळा आणि पाटेगाव येथील औद्योगिक वसाहतीच्या परिसरात बड्या धेंड्यांच्या जमिनी

आमदार शिंदे पुढे म्हणाले, खंडाळा आणि पाटेगाव येथे औद्योगिक वसाहतीचा जो घाट घातला जात आहे तिथे निरव दीपक मोदी गट नंबर 35, मनीषा अण्णा काचोले गट नंबर 37 ए, नयन गणेश अग्रवाल 37/1, निरव मोदी गट नंबर 39 /1, निरव मोदी गट नंबर 39 /2, कमलेश रतिलाल शहा गट नंबर 40,.कमलेश रतिलाल शहा गट नंबर 41, कमलेश रतिलाल शहा गट नंबर 42,  पंकज विनोद खन्ना गट नंबर 4, गणेश ओमप्रकाश अग्रवाल गट नंबर 48 , निरव दीपक मोदी गट नंबर 58 व 59, निरव दिपक मोदी व इतर गट नंबर G1, G2, G3 अश्या पध्दतीचे उद्योजक आणि गुंतवणूकदारांच्या या ठिकाणी जमिनी आहेत. त्यांनी कवडीमोल किमतीने या जमिनी घेतल्या आहेत. ही एमआयडीसी गुंतवणूकदारांसाठी करायचीय का? शेतकऱ्यांसाठी करायचीय ? का बेरोजगारांसाठी एमआयडीसी करायची हे देखील इथं कळणं इथे आवश्यक आहे, असे म्हणत आमदार प्रा राम शिंदे यांनी सभागृहात मोठा धमाका केला.