जामखेड : बारामतीच्या ठेकेदाराकडून रस्त्याच्या कामात मातीमिश्रीत मुरुमाचा वापर : निकृष्ठ दर्जाच्या कामाबाबत भाजपा नेते रविंद्र सुरवसे झाले आक्रमक !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । खर्डा शहरातून जाणाऱ्या राज्यमार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या सुरु आहे. संबंधित ठेकेदाराने रस्ता रुंदीकरणाच्या कामात खडीवर पक्का मुरुम न टाकता मातीमिश्रीत मुरुमाचा सर्रास वापर केल्याची धक्कादायक बाबा चव्हाट्यावर आली आहे. बारामतीच्या ठेकेदाराकडे सदर रस्त्याचे काम आहे. बारामतीच्या आशिर्वादानेच संबंधित ठेकेदाराकडून रस्ता रुंदीकरणाचे काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचे यानिमित्ताने चव्हाट्यावर आले आहे. निकृष्ठ दर्जाच्या रस्ता कामामुळे भाजपा नेते रविंद्र सुरवसे आक्रमक झाले आहेत.
जामखेडकडून भूमच्या दिशेने जाणाऱ्या राज्य मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. या कामासाठी बारामतीच्या आशीर्वादाने बारामतीची ठेकेदार कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. कोट्यावधी रूपये खर्चाच्या या रस्त्याचे काम खर्डा शहराजवळ निकृष्ट दर्जाचे होत असल्याची बाब भाजपा नेते रविंद्र सुरवसे यांनी उघडकीस आणली आहे. सदर रस्त्याचे रुंदीकरणाचे काम करताना करण्यात आलेल्या खडीकरणावर पक्का मुरुम टाकणे अपेक्षित असताना संबंधित ठेकेदाराने काही ठिकाणी माती मिश्रित मुरुम तर काही ठिकाणी थेट शेतातली माती टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
आज सदर रस्त्याच्या निकृष्ठ दर्जाच्या कामाची भाजपा नेते रविंद्र सुरवसे, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शिवराज पानसरे, खर्डा तलाठी श्रीराम कुलकर्णी, मदन गोलेकर, टिल्लू पंजाबी, बाळासाहेब गोपाळघरे, भागवत सुरवसे यांनी पाहणी केली. यावेळी भाजपा नेते रविंद्र सुरवसे यांनी सदर निकृष्ठ कामाबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. भाजपा नेते रविंद्र सुरवसे आणि ग्रामस्थांच्या मागणीनंतर सदर रस्त्याचे काम तातडीने बंद करण्यात आले आहे.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता शिवराज पानसरे यांच्याकडे सदर कामाबाबत चौकशी केली असता, ते म्हणाले की, सदर कामावर संबंधित ठेकेदार कंपनीकडून मातीमिश्रीत मुरुम टाकण्यात आला आहे, आज कामाची पाहणी केली, संबंधित मातीमिश्रीत मुरुम तातडीने हटवण्याच्या सुचना संबंधित ठेकेदाराला दिल्याची माहिती दिली.