सोलापूरच्या समीर शेखने गाजवले जामखेडचे कुस्ती मैदान, नागेश्वर यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानाला तुफान प्रतिसाद
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेडचे ग्रामदैवत श्री नागेश्वर यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती मैदानात शेवटची मानाची कुस्ती सोलापूरच्या समीर शेख या मल्लाने जिंकली. घिस्सा डावावर समीर शेख याने युवराज चव्हाण याला चितपट केले. या कुस्तीचा मान आणि बक्षीस आमदार प्रा.राम शिंदे यांचे होते. अतिशय रोमहर्षक वातावरणात कुस्ती मैदान रंगले होते. या मैदानाला दरवर्षीप्रमाणे यंदा तुफान प्रतिसाद मिळाला.
कै. विष्णू उस्ताद काशीद (बाबा) यांच्या स्मरणार्थ गेल्या 20 वर्षांपासून ग्रामदैवत श्री नागेश्वर यात्रेनिमित्त जामखेड शहरात निकाली कुस्ती मैदानाचे आयोजन केले जाते. हे मैदान उप महाराष्ट्र केसरी बबन (काका) काशीद, मराठा गौरव युवराज भाऊ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली सारोळ्याचे सरपंच ॲड अजय (दादा) काशीद व त्यांच्या मित्रपरिवाराकडून भरवले जाते.
यंदाच्या कुस्ती मैदानासाठी राज्यातील नामवंत मल्लांनी हजेरी लावली. तसेच महिला मल्लांनी सुध्दा या मैदानात हजेरी लावून उपस्थितांची मने जिंकली. डोळ्यांची पारणे फेडणार्या कुस्त्या पाहून मैदानात मोठा जोश भरला होता. सहा तास कुस्त्यांचे चित्तथरारक सामने या मैदानात सुरू होते. रात्री 9 वाजता शेवटची मानाची निकाली कुस्ती पार पडली.
कुस्ती मैदानाच्या प्रारंभी अर्जुन पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय मल्ल डीवायएसपी राहुल आवारे तसेच आशियायी स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेले सुजय तनपुरे यांचा आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
मराठी भाषिक संघाच्या अध्यक्ष स्वातीताई काशीद आणि मराठा गौरव युवराज (भाऊ) काशीद यांनी सिंदखेड राजा ते इंदोर पदयात्रा काढून इंदोर या ठिकाणी 9.5 फुटी जिजामाता प्रतिमा बसवली त्याबद्दल जामखेडकरांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ल.ना होशिंग शाळेसाठी क्रीडा साहित्य, शाळांसाठी जिजामाता पुस्तकाच्या तीन हजार प्रती यावेळी वितरित करण्यात आल्या.
यावेळी पार पडलेल्या कुस्ती मैदानासाठी परमपूज्य संत श्री 1008 महामंडलेश्वर दादुजी महाराज शनी पुत्र इंदोर, महादेवानंद भारती महाराज, प्रेमानंद महाराज, शिवाजी महाराज येवले, दीपक शिंदे,स्वप्नील गौड इंदोर, अक्षय भैय्या, लोकेश वर्मा, सागर धस, डॉक्टर भगवान मुरूमकर, सोमनाथ पाचरणे, शरद कार्ले, गौतम उतेकर, सह आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपचे तालुकाध्यक्ष अजय (दादा) काशीद यांनी केले. तर आभार नारायण राऊत यांनी मानले.