जामखेड: कर्जत फाटा ते शासकीय दुध डेअरी रस्ता बनला मृत्यूचा सापळा, निसरड्या रस्त्यामुळे अपघाताची मालिका सुरु, जनतेतून व्यक्त होतोय संताप !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । जामखेड शहरातील बीड काॅर्नर ते कर्जत फाटा हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असल्याचे दिसून येत आहे. या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य असल्याने बीड काॅर्नर ते कर्जत फाटा या भागात दररोज पाणी मारले जात आहे. या पाण्यामुळे रस्त्यावर चिखल होऊन दुचाकीस्वारांचे दररोज अपघात होत आहेत.या अपघातामुळे अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच अनेक नागरिक रस्त्यावरून पायी चालताना पाय घसरून पडत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. निसरड्या रस्त्यामुळे जीव मुठीत धरून नागरिकांचा दररोज शहरातून प्रवास सुरु आहे.

jamkhed, Road from Karjat Fata to Govt Dudh Dairy has become death trap, series of accidents have started due to slippery road, people are expressing their anger

जामखेड शहरातून बीडकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. सध्या या महामार्गाचे शहराबाहेरील रस्त्याचे काम सुरु आहे. शहरातील कामाला अजून मुहूर्त लागलेला नाही. शहरातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने संबंधित ठेकेदाराने कर्जत फाटा ते शासकीय दुध डेअरीपर्यंत असलेल्या डांबरी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी मातीमिश्रीत मुरुमाने बुजवले खरे पण खड्ड्यांचा त्रासातून सुटका झालेल्या जामखेडकरांच्या नशिबी धुळीचे संकट वाट्याला आले.

jamkhed, Road from Karjat Fata to Govt Dudh Dairy has become death trap, series of accidents have started due to slippery road, people are expressing their anger

यामुळे संतप्त नागरिकांनी तक्रारी केल्या. यावर तोडगा म्हणून संबंधित ठेकेदाराने शहरातील  सकाळी आणि संध्याकाळी टँकरद्वारे पाणी टाकण्याचा प्रयत्न करून धुळीपासुन सुटका  करण्याचा प्रयत्न केला पण जामखेडकरांच्या नशिबी आगीतून फुफाट्यात पडणेच आले.

जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यातून सुटका झाली खरी पण रस्त्यावर टाकलेल्या मुरूमामुळे आणि त्यावर पडणाऱ्या पाण्यामुळे रस्ता निसरडा बनला आहे.  राज लाॅन्स परिसरात तर हा रस्ता अतिशय धोकादायक बनला आहे. या ठिकाणी दररोज दहा ते पंधरा अपघात होत आहेत. यात अनेक जण जखमी होत आहेत. याशिवाय पुढारी वडासमोरही दररोज दुचाकी घसरून अपघात होत आहेत. पायी चालणारे नागरिक पाय घसरून पडत आहेत. यामुळे सध्या हा रस्ता मृत्यूचा सापळा बनल्याचे दिसून येत आहेत.

राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक दिवसांपासून मंजुर आहे. शहराबाहेरील रस्त्याचे काम वेगाने सुरु आहे, परंतू मुख्य शहरातील रस्त्याचे काम अजून सुरु झालेले नाही. हे काम का सुरु होत नाही याबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.  सदरचे काम तातडीने सुरु न झाल्यास शहरातील नागरिकांचा उद्रेक कोणत्याही क्षणी उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. असेच सध्याचे वातावरण आहे. शहरातील नागरिक सदरच्या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आता आक्रमकपणे संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

जामखेड शहरातील रस्त्यांवर दररोज दोन वेळेस पाणी टाकण्यात येत असल्याने रस्ता निसरडा बनून अपघात होत आहेत. ही बाब राजकीय पक्षांना माहित आहे, परंतू कुठलाही राजकीय पक्ष या गंभीर प्रश्नांवर आवाज उठवताना दिसत नसल्याने नागरिकांमधून राजकीय पक्षांच्या चिडीचूप भूमिकेबद्दल रोष व्यक्त केला जात आहे.