जामखेड: भुतवड्यात मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ; जेवत असताना आई-मुलावर प्राणघातक हल्ला, ६५ हजारांचा ऐवज लंपास

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : जामखेड शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भुतवडा गावात मध्यरात्री चोरट्यांनी मोठा धुमाकूळ घातला. तलाववस्ती परिसरातील एका घरात घुसून आई व मुलाला लोखंडी रॉडने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत ६५ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात चार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jamkhed, Thieves go on rampage in Bhutvada at midnight, mother and son brutally attacked while eating, valuables worth ₹65,000 stolen,

मिळालेल्या माहितीनुसार, भुतवडा (तलाववस्ती) येथील रहिवासी व व्यवसाय ड्रायव्हर असलेले सुरेश जालिंदर डोके (वय ३३) हे १० ऑगस्ट रोजी गाडी भाड्याने घेऊन गेले होते. ११ ऑगस्ट रोजी रात्री १:३० वाजता ते घरी परतले. रात्री २ वाजेच्या सुमारास घरातील लाईट सुरू करून, घराचा दरवाजा थोडा उघडा ठेवून ते जेवण करत असताना अचानक २५ ते ३० वर्षे वयोगटातील चार अनोळखी चोरटे घरात घुसले. चारही चोरट्यांनी तोंडाला मास्क बांधलेले होते. यातील एका चोरट्याने चॉकलेटी रंगाचा शर्ट, दुसऱ्याने हिरव्या रंगाचा शर्ट, तिसऱ्याने पांढऱ्या रंगाचा पट्ट्यांचा टी-शर्ट, तर चौथ्याने काळ्या रंगाचा टी-शर्ट परिधान केलेला होता.

Jamkhed, Thieves go on rampage in Bhutvada at midnight, mother and son brutally attacked while eating, valuables worth ₹65,000 stolen,

लोखंडी रॉडने मारहाण अन् ६५ हजारांची लूट

घरात घुसताच चोरट्यांनी सुरेश डोके आणि त्यांची आई केशरबाई यांना लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यानंतर घरातील सामानाची उचकापाचक करत केशरबाई यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने बळजबरीने काढून घेतले. तसेच पेटीत ठेवलेली २० हजार रुपयांची रोकड आणि सुरेश डोके यांचा ५ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

या मारहाणीत जखमी झालेल्या सुरेश डोके व त्यांच्या आई केशरबाई यांना तात्काळ जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. केशरबाई यांना जास्त मारहाण झाल्याने गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गावातील इतर ३ घरेही फोडली

दरम्यान, ११ ऑगस्टच्या रात्री गावातील बाबासाहेब भगवान डोके, अजिनाथ श्रीधर डोके आणि अशोक आण्णा डोके यांच्या घरीदेखील चोरी झाल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले. या घटनेप्रकरणी सुरेश जालिंदर डोके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनला चार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश अघाव हे करत आहेत.