मोठी बातमी : जातेगावचा ग्रामसेवक अडकला लाचखोरीत, ५ हजाराची लाच घेताना एसीबीने पकडले, जामखेड तालुक्यात खळबळ
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : ग्रामपंचायतीशी संबंधित माहिती देण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यातील ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जातेगाव ग्रामपंचायतचा ग्रामसेवक महादेव मल्हारी ढाकणे (वय ५२) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. मंगळवार, ११ ऑगस्ट रोजी जामखेड येथील हॉटेल महाभगवती परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे जामखेड तालुक्यातील प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

नेमके प्रकरण काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, ५२ वर्षीय तक्रारदाराने ग्रामपंचायत जातेगाव येथील कामाकाजाबाबत आणि ग्रामपंचायतीशी संबंधित जन्म – मृत्यूशी संबंधित काही माहिती मिळवण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी महादेव ढाकणे यांच्याशी संपर्क साधला होता. ही माहिती देण्यासाठी ग्रामसेवक ढाकणे याने तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची लाच मागितली होती.
‘एसीबी’चा सापळा आणि धडक कारवाई
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर येथे तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने तक्रारीची सखोल पडताळणी केल्यानंतर लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ११ ऑगस्ट २०२६ रोजी जामखेडच्या खर्डा रोड येथील हॉटेल महाभगवती परिसरात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अधिकारी महादेव ढाकणे याला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. उर्वरित रक्कमेबाबतही उभयतांमध्ये संभाषण झाल्याचे एसीबीने प्रसिद्ध केलेल्या नोटमध्ये नमूद आहे.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
या प्रकरणी आरोपी ग्रामपंचायत अधिकारी महादेव ढाकणे याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध जामखेड पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (अहिल्यानगर) च्या पोलीस निरीक्षक सविता तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांनी पर्यवेक्षण अधिकारी म्हणून काम पाहिले. तर सापळा पथकात पोलीस नाईक चंद्रकांत काळे (पोना/७०), पोलीस अंमलदार शेखर वाघ (पोको/२२६२) आणि चालक पोलीस हवालदार करांडे यांचा समावेश होता.