Jamkhed Breaking News | सहकार विभागाची छापेमारी; जामखेड तालुक्यात अवैध सावकारकीचा चौथा गुन्हा दाखल

सहकार विभागाकडून जामखेड पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : जामखेडचे पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी जामखेड तालुक्यातील अवैध सावकारकीचा बिमोड करण्यासाठी हाती घेतलेल्या मोहिमेनुसार शुक्रवारी जामखेड पोलिस स्टेशनला आणखी एका सावकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंबंधी सहकार विभागाकडून जामखेड पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर असे की, जामखेड येथील सदाफुले परिसरात राहणारे वसीम बशीर सय्यद यांनी जामखेडच्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडे रत्नापुर येथील बबन श्रीराम वराट या सावकाराविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाने सय्यद यांनी दिलेल्या तक्रार अर्जावरून 30 रोजी सकाळी 09 वाजता बबन वराट या सावकाराच्या घरी छापेमारी केली. या छापेमारीत बेकायदेशीर सावकारी बाबत आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आले आहेत. एक डायरी व कोरे चेक पथकाने हस्तगत केले आहेत.

सहकार अधिकारी साहेबराव दत्तात्रय पाटील यांनी जामखेड पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. यात म्हटले आहे की, वसीम बशीर सय्यद राहणार सदाफुले वस्ती तालुका जामखेड यांच्या तक्रार अर्जासोबत सादर केलेली व्यवहार पावती, कागदपत्रे, छाप्यात सापडलेली बेकायदेशीर सावकारी बाबतचे आक्षेपार्ह कागदपत्रे व वस्तू यांची छाननी केली असता बबन श्रीराम वराट हा बेकायदेशीर सावकारी करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार वराट याच्याविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला बेकायदेशीर सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल अंमलदार म्हणून अजय साठे यांनी काम पाहिले. पुढील तपास बाळासाहेब तागड हे करत आहेत.

जामखेड तालुक्यात अवैध सावकारांचे आता बारा वाजल्यात जमा आहे.पंधरा दिवसांच्या आत जामखेड पोलिस स्टेशनला सावकारकीचे चार गुन्हे दाखल झाल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. सावकारांच्या जाचातून जामखेडकरांची सुटका व्हावी यासाठी आणखी मोठी कारवाई होणे आवश्यक आहे. बड्या धेंड्यांना बेड्या ठोकण्यासाठी पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या टिमने आता जाळे टाकले आहे. लवकरच पांढरपेश्या सावकारांना बेड्या ठोकल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 

web titel : Jamkhed Breaking News Raid of Co-operation Department Fourth case of illegal lending filed in Jamkhed taluka