Jamkhed Big Breaking | दुहेरी आत्महत्येच्या घटनेने जामखेड तालुका हादरला  

एकाच दिवशी प्रेमीयुगलांनी संपवली जीवनयात्रा

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Jamkhed Big Breaking | जामखेड तालुक्यातून बुधवारी एक खळबळजनक घटना समोर आली. या घटनेत अल्पवयीन प्रेमीयुगलांनी एकाच दिवशी आत्महत्या केल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. दुहेरी आत्महत्येच्या घटनेमुळे जामखेड तालुका पुरता हादरून गेला आहे.

जामखेड तालुक्यातील आपटी या गावातून दुहेरी आत्महत्येची घटना समोर आली आहे. या घटनेत अल्पवयीन प्रियेसीने आत्महत्या केल्यानंतर काही वेळात अल्पवयीन प्रियकर असलेल्या तरूणाने आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेत दोघांनी आत्महत्या का केली ? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. जामखेड पोलिसांत याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जामखेड तालुक्यातील आपटी येथील आशा ऊर्फ अश्विनी गोपीनाथ घुले वय वर्षे 16 या अल्पवयीन मुलीने दुपारी एक वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस येताच मोठी खळबळ उडाली होती. या घटनेनंतर आपटी गावातील अल्पवयीन तरूण अशोक बंडू कडू वय 17 या तरूणाने काही तासानंतर गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.

मयत आशा हिच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर तिच्या मृत्यूची खात्री करण्यासाठी मयत अशोक हा तिच्या घरी जाऊन आला होता. त्यानंतर त्याने वाट्सअपवर ‘मी देखील जीवन संपवत आहे ‘ असे स्टेटस ठेवले होते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. दुहेरी आत्महत्येच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

आपटी आत्महत्या प्रकरणातील दोघा अल्पवयीनांचे प्रेमसंबंध होते अशी माहिती समोर येत आहे. दोघांच्या आत्महत्येचे ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान या घटनेमुळे जामखेड तालुका हादरून गेला असून आपटी परिसरावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच जामखेड पोलिसांनी तातडीने आमटीला धाव घेतली. सध्या दोन्ही घटनेचा जामखेड पोलिस कसून तपास करत आहेत. वेगवेगळ्या अंगाने या घटनेचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड,सपोनि सुनिल बडे, पो. ना संभाजी शेंडे, पो. कॉ. शशी मस्के व पो. कॉ. संजय जायभाय यांनी भेट दिली.