- Advertisement -

Karjat Nagar Panchayat election | कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीचे बिगूल वाजले, रोहित पवार व राम शिंदे यांची प्रतिष्ठा लागणार पणाला  

राज्यातील १०५ नगरपंचायतींसाठी होणार २१ डिसेंबरला मतदान 

जामखेड टाईम्स वृत्तसेवा : Karjat Nagar Panchayat election | महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यांमधील १०५ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रमांची घोषणा बुधवारी राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील चार नगरपंचायतींचा समावेश आहे.

कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातील कर्जत नगरपंचायताही यात समावेश आहे.आजपासून कर्जत शहरात अचारसंहिता लागु झाली आहे. कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीत आमदार रोहित पवार व माजी मंत्री राम शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच शिंदे व पवार हे दोन्ही नेते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. यामुळे राज्याच्या राजकारणात येथील निवडणुक पुन्हा एकदा गाजणार आहे. आपापल्या पॅनलमध्ये तगडे उमेदवार रिंगणात उतरवून नगरपंचायतीवर आपला झेंडा फडकवण्यासाठी शिंदे विरूध्द पवार हा सामना जोरदार रंगताना दिसणार आहे.

दरम्यान राज्यातील १०५ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान तर; २२ डिसेंबर २०२१ मतमोजणी होईल. त्यासाठी संबंधित नगरपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी मुंबई येथे बोलताना केली.

राज्य निवडणूक आयुक्त यु पी एस मदान यांनी सांगितले की, राज्यातील एप्रिल २०२० ते मे २०२१ या कालावधीत मुदत संपलेल्या ८१ आणि डिसेंबर २०२१ मध्ये मुदत संपणाऱ्या १८; तसेच नवनिर्मित ६ अशा एकूण १०५ नगरपंचायतींच्या प्रत्येकी १७ सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होईल.

त्यासाठी १ ते ७ डिसेंबर २०२१ या कालावधीत नामनिर्देशनपत्रे •स्वीकारण्यात येतील. ४ व ५ डिसेंबर २०२१ रोजी सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी ८ डिसेंबर २०२१ रोजी होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरूद्ध अपील नसलेल्या ठिकाणी नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत १३ डिसेंबर २०२१ असेल.

अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत अपिलाचा निर्णय प्राप्त झाल्यानंतर तिसऱ्या दिवसापर्यंत किंवा १६ डिसेंबर २०२१ पर्यंत असेल. मतदान २१ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत असेल. २२ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल. राखीव जागेवर निवडणूक लढविणान्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

त्याचबरोबर कोविड- १९ संदर्भात केंद्र व राज्य शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार व आवश्यक त्या उपाययोजना करून या निवडणुकांचा कार्यक्रम राबवावा. त्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर २०२० रोजी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करावी, असेही निर्देश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहितीही मदान यांनी दिली.

सार्वत्रिक निवडणूक होत असलेल्या नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे खालील प्रमाणे

ठाणे  : मुरबाड व शहापूर

पालघर : तलासरी, विक्रमगड, मोखाडा,

रायगड : खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित)

रत्नागिरी– मंडणगड, दापोली,

सिंधुदुर्ग  – कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ,

पुणे –  देहू (नवनिर्मित),

सातारा – लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहीवडी,

सांगली  – कडेगाव, खानापूर, कवठे-महाकाळ,

सोलापूर – माढा, माळशिरस, महाळूंग- श्रीपूर (नवनिर्मित), वैराग (नवनिर्मित), नातेपुते (नवनिर्मित),

नाशिक –  निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा,

धुळे – साक्री,

नंदुरबार – धडगाव-वडफळ्या-रोषणमाळ,

अहमदनगर – अकोले, कर्जत, पारनेर, शिर्डी, 

जळगाव – बोदवड,

औरंगाबाद– सोयगाव,

जालना – बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी (नवनिर्मित),

परभणी– पालम,

बीड– केज, शिरूर कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी,

लातूर– जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर अनंतपाळ,

उस्मानाबाद– वाशी, लोहारा बु.

नांदेड – नायगाव, अर्धापूर, माहूर,

हिंगोली – सेनगाव, औंढा नागनाथ,

अमरावती – भातकुली, तिवसा,

बुलडाणा – संग्रामपूर, मोताळा,

यवतमाळ – महागाव, कळंब, बाभुळगाव, राळेगाव, मारेगाव, झरी जामणी, वाशीम मानोरा,

नागपूर – हिंगणा, कुही,

वर्धा– कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर,

भंडारा– मोहाडी, लाखनी, लाखांदूर,

गोंदिया– सडकअर्जुनी, अर्जुनी, देवरी, सावली,

चंद्रपूर– पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही, मुलचेरा,

गडचिरोली– एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा आणि भामरागड

पोटनिवडणुकांसाठीही मतदान

राज्यातील विविध जिल्ह्यातील सात नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या रिक्त जागांसाठीदेखील २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार आहे.

शिरोळ (६ अ), नागभीड (४ अ), जत (५ ब), सिल्लोड (१२ अ), फुलंब्री (२ आणि ८), वानाडोंगरी (६ अ) आणि ढाणकी (१२ आण १३) या नगरपरिषद/ नगरपंचायतीतील सदस्यपदांच्या रिक्तपदांसाठी या पोटनिवडणुका होत आहे.