धक्कादायक : स्कुटीच्या डिक्कीत आढळले देशी बनावटीचे पिस्टल व सहा जिवंत काडतुसे, जामखेड शहरातील घटनेने उडाली खळबळ

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : एका स्कुटीमध्ये देशी बनावटीचे एक पिस्टल व सहा जिवंत काडतुसे आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.कलम 307 च्या गुन्ह्याचा तपास करत असलेल्या जामखेड पोलिसांना घटनास्थळाचा पंचनामा करताना आरोपीची स्कुटी सापडली. त्यात एक पिस्टल व सहा जिवंत काडतुसे आढळून आले. यामुळे जामखेड शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान या प्रकरणातील आरोपींविरुद्ध जामखेड पोलिसांनी भारतीय हत्यार कायदा कलम 3 / 25 सह मोटार वाहन कायदा कलम 39/192 (1) प्रमाणे वाढीव कलमे लावली आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली आहे.

जामखेड शहरात 29 जूलै 2023 रोजी अर्थराज दिलीप गायकवाड वय 24 वर्षे रा. भुतवडा रोड, जामखेड या तरूणाच्या घरासमोर आठ ते दहा जणांचे टोळके तीन लहान मुलांना मारहाण करत होते. त्यावेळी अर्थराज दिलीप पवार याने सदर मारहाण थांबविण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने अभिजीत उल्हास माने व तुषार हनुमंत पवार या दोघांनी अर्थराज गायकवाड याच्यावर चाकु व वस्ताऱ्याने हल्ला करत त्याला जखमी केले. तसेच त्याच्या घरात घुसुन त्याच्या आई वडीलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना रात्री आठ ते 9 वाजेच्या सुमारास घडली होती, अशी फिर्याद जामखेड पोलिस स्टेशनला दाखल आहे.

Shocking, country-made pistol and six live cartridges found in trunk of scooty, incident in Jamkhed city sparked stir, jamkhed crime news today,
सदर छायाचित्र घटनास्थळाहून सापडलेल्या पिस्टलचे नसून प्रतिकात्मक आहे.

त्यानुसार जामखेड पोलिस स्टेशनला अभिजीत उल्हास माने, तुषार हनुमंत पवार, सोमनाथ हनुमंत पवार, भरत जायगुडे (पुर्ण नाव माहित नाही),  राहुल शिरगीरे (पूर्ण नाव माहित नाही), नामदेव शिरगीरे (पुर्ण नाव माहित नाही), तुषार ऊर्फ टी. डी. (पुर्ण नाव माहित नाही) सर्व रा.जांबवाडी, ता. जामखेड, जि. अहमदनगर, अक्षय शिंदे (पुर्ण नाव माहित नाही) रा. खाडेनगर, यांच्याविरुध्द अर्थराज दिलीप गायकवाड या तरूणाने फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार जामखेड पोलीस स्टेशनला गु.र.नं. 343/ 2023 भादवि कलम 307, 452, 323, 504, 506,147, 148, 149 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

स्कुटीच्या डिक्कीत आढळले पिस्टल

खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल असलेल्या वरिल गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिस उपनिरीक्षक अनिल भारती हे पोलीस पथक व दोन शासकीय पंच यांच्यासह घटनास्थळावर पंचनामा करण्यासाठी गेले होते.त्यावेळी पोलीस पथकाला घटनास्थळी विना नंबरची स्कुटी आढळून आली. सदरची स्कुटी मारहाण केलेल्या आरोपींची असल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले.त्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष सदर स्कुटीच्या कागदपत्रांची पाहणी करण्या करिता डिक्की तोडून उघडण्यात आली. त्यावेळी त्यामध्ये एक देशी बनावटीचे पिस्टल व सहा जीवंत राऊंड पोलिसांना मिळून आले.

जामखेड पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल खालीलप्रमाणे

1) 11,000/- रु. किं.ची एक होण्डा कंपनीची डीओ मॉडेलची स्कुटर नंबर नसलेली, ठिकठिकाणी तुटलेली, तिचा चासी नं. ME4JF39DAJ7098591 व इंजिन नं. JF3972148048
2) 30,000/- रु. कि. चे एक देशी बनावटीचे पिस्टल, त्यात मॅगझीन
3) 1200/- रु. किं.चे सहा जिवंत काडतुसे नमुद पिस्टलचे मॅगझीन मध्ये असलेले त्यापैकी पाच काडतुसावर FF दोन वेळा व एका काडतुसावर KF 7.65 असे लिहिलेले

307 च्या गुन्ह्यात लावण्यात आली वाढीव कलमे

सदरची स्कुटर व नमुद पिस्टल व राऊंड पोलिसांनी ताब्यात घेतले. गाडीबाबत खात्री करता सदर गाडी अभिजीत उल्हास माने रा. जांबवाडी, ता. जामखेड, जि. अहमदनगर यांची असल्याची व त्याने तीची आर.टी.ओ. पासिंग न करता तशीच वापरत असल्याचे उघड झाले आहे.आरोपी हे फिर्यादी व साक्षीदार यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने आलेला असल्याची खात्री झाल्याने सदर गुन्ह्यास भारतीय हत्यार कायदा कलम 3 / 25 सह मोटार वाहन कायदा कलम 39/192 (1) प्रमाणे वाढीव कलम लावण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी दिली.

कारवाईच्या पथकात यांचा होता समावेश

सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडे, पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती, पोकॉ/1138 सचिन देवढे, पोकॉ/ 542 विजय सुपेकर यांचे पथकाने केली आहे. या गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती हे करत आहेत.