पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन

जामखेड टाईम्स वृत्तसेवा  : राज्यात कोरोना महामारीमुळे रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. राज्यात रक्ताचा तुडवडा वाढू लागला आहे. याशिवाय करोना रूग्णांवरील उपचारात महत्वाच्या ठरत असलेल्या प्लाझ्माचीही मोठ्या प्रमाणावर मागणी वाढू लागली आहे. रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी राज्यात वेगवेगळ्या स्वंयसेवी संस्था पुढे सरसावल्या आहेत. त्यातच अहमदनगर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जामखेड पोलिस दलानेही आता पुढाकार घेतला आहे. जामखेडचे पोलिस निरिक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या संकल्पनेतून दिनांक 01 मे रोजी जामखेडमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर महावीर मंगल कार्यालयात पार पडणार आहे.

जगातील सर्वश्रेष्ठ दान असलेल्या रक्तदानाच्या या महायज्ञात जामखेड तालुक्यातील युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन मानवतेच्या कार्याचा भाग बनावे असे अवाहन जामखेडचे  पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी केले आहे. 

राज्यात 18 वर्षावरील सर्वांचे कोरोना लसीकरण केले जाणार आहे. या काळात पुढील दीड ते दोन महिने लस घेतलेल्या नागरिकांना रक्तदान करता येणार नाही. या काळात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये याकरिता लसीकरणाआधी युवकांनी जास्तीत जास्त रक्तदान करण्याची आवश्यकता आहे.