रूग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सीजन आणण्यासाठी पाठवू नका : जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचे आदेश

जामखेड टाईम्स वृत्तसेवा: अहमदनगर जिल्ह्यात सध्या कोरोनाचा भडका उडाला आहे. जिल्ह्यातील सर्व रूग्णालये हाऊसफुल आहेत. रोज कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ऑक्सिजन बेड, आयसीयु व व्हेंटीलेटरवर असलेल्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्याने मेडीकल ऑक्सिजनची मागणी वाढलेली आहे.जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांनी ऑक्सिजनचे सिलिंडर रिफिलर अथवा उत्पादक यांच्याकडून भरून आणण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना पाठवण्याचे प्रकार सातत्याने समोर येत होते. यातुन नातेवाईकांचे मोठे हाल होत होते.

दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी आज खाजगी रूग्णालयात भरती असलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सीजन आणण्यासाठी पाठवू नये असे आदेश खाजगी रूग्णालयांना दिल्याने रूग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातील काही रुग्णालयांमध्ये ऍडमिट असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजनचे सिलेंडर रिफीलर किंवा उत्पादक यांच्याकडून भरून आणणेबाबत सांगण्यात येते. ही बाब अयोग्य असुन त्यामुळे रिफीलर किंवा उत्पादक या ठिकाणी अनावश्यक गर्दी होते. तथापि,  रुग्णालयांनी त्यांच्या कर्मचा-याला ऑक्सिजन सिलेंडर आणण्याकरीता प्राधिकृत करावे. या प्राधिकृत व्यक्तीस प्राधिकार पत्राशिवाय रिफीलर उत्पादकचे ठिकाणी ऑक्सिजन सिलेंडर भरुन मिळणार नाही याची नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे