आज मला जगाचा निरोप घ्यावा लागत आहे या फेसबूक पोस्टवर पोलिस निरीक्षकांची कमेंट आणि पुढे जे घडलं ते वाचून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । डाॅ अफरोजखान पठाण : “आपण अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावत आलो आहोत. त्यांना न्याय मिळवून देत आहोत. याबाबत चर्चा करू हा प्रश्न मी मार्गी लावतो तु असा अविचार मनात आणू नकोस’ अशी कमेंट कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी फेसबुकवर टाकली अन तरुणाचे मन परिवर्तन झाले. आणि त्या युवकाने उचलले टोकाचे पाऊल मागे घेतले. अखेर त्या युवकास पोलीस निरीक्षक यादव यांनी न्याय दिला आणि ती जमीन त्याला परत मिळवून दिली. (Police Inspector Chandrasekhar Yadav’s Facebook comment saved the life of a youth)
कुळधरण (ता.कर्जत) येथील युवकाने “आज मला या जगाचा निरोप घ्यावा लागत आहे. माझ्या कुटुंबावर मोठा अन्याय झाला आहे. आमची जमीन बळकावली आहे. वैतागून मला आत्महत्येला प्रवृत्त केले गेले आहे. मी कुठेतरी लटकलेली बातमी येईल.एकांतात जाऊन निरोप घेतो !’ अशी सोशल मिडीयावर पोस्ट टाकत आपला मोबाईल बंद केला. या पोस्टने कुळधरण आणि कर्जत तालुका परिसरात चांगलीच खळबळ उडवली.
कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या कानावर सदर प्रकार गेला. त्यांनी तात्काळ पोलीस पथक तयार करीत गावातील शेत- शिवार, घनदाट झाडे विहीर, तलाव याठिकाणी शोधा-शोध सुरू झाली. वेळ दवडत होता तसा प्रत्येकाचा मनाचा ठेका चुकत होता. त्या तरुणाचे मित्र, नातेवाईक यांच्यासह परिवार देखील हतबल झाले होते.
यावेळी अचानक पोलीस निरीक्षक यादव यांच्या डोक्यात एक कल्पना सुचली. त्यांनी त्याच पोस्टवर आपल्या स्वतःच्या फेसबुक अकाऊंटवरून “आपण अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावत आलो आहोत. त्यांना न्याय मिळवून देत आहोत. याबाबत चर्चा करू हा प्रश्न मी मार्गी लावतो तु असा अविचार मनात आणू नकोस’ असा रिप्लाय दिला.
या रिप्लायवर अनेक मित्रांनी लाईक देत पोलीस निरीक्षक यादव यांच्या भूमिकेचे समर्थन केले. आणि चक्क काही वेळातच त्या युवकाने यादव यांना स्वतःहून कॉल करत आपण सुखरूप असल्याचे सांगितले. यावेळी यादव यांनी त्यास दिलासा देत तुम्ही आता कुठे आहे ? म्हणत त्यास बोलते केले. ठीक आहे आपण आता तुला त्याठिकाणी न्यायला येत असल्याचे म्हंटले. त्या युवकाने आपण मढेवडगाव (ता.श्रीगोंदा) कॅनॉलच्या चारीजवळ एकांत असणाऱ्या ठिकाणी असल्याचे सांगितले. पोलीस निरीक्षक यादव यांनी तात्काळ श्रीगोंदा पोलीस दलास तो पत्ता सांगत युवकास सही-सलामत ताब्यात घेतले.
त्या युवकास सुखरूप कर्जतला आणण्यात आले मात्र त्यास दिलेला शब्द पाळण्याची खरी कसोटी आता पो नि यादव यांना पाळायची होती. यादव यांनी वाद असणाऱ्या दोन्ही गटास कर्जत पोलीस ठाण्यात पाचारण केले. त्यांच्यामध्ये चर्चा घडवली ‘आता मला सांगा, जमीन,धन-दौलत,पैसा तुमच्या रक्ताच्या नात्यांपेक्षा कधी मोठा झाला ? जाताना सगळं इथंच ठेऊन जायचं आहे. नाती जपा, माणुसकी टिकवा, प्रेम वाढवा असा युक्तिवाद केला. सवाल-जवाबमध्ये दोन्ही गटाची सकारात्मक चर्चा झाली. गावचे पोलीस पाटील आणि पदाधिकारी यांनी देखील छान भूमिका पार पाडली.
अखेर त्या युवकाच्या हिश्याची जमीन त्याच्या नावावर करून देण्याची संमती झाली. काल ती जमीन नावावर होताच तो युवक आणि त्याचे कुटुंब कर्जत पोलीस ठाण्यात येत त्यानी पो नि यादव यांना मनापासून धन्यवाद व्यक्त करीत आभार मानले. तसेच त्यांचा सत्कार करीत “साहेब, आज केवळ आपल्यामुळेच मी माझ्या परिवारात आहे. तुम्ही त्या दिवशी माझे मन परिवर्तन केले नसते तर कदाचित मी नैराश्यातून काही तरी अघटित केले असते” असे म्हणत सर्व पोलीस विभागाचे आभार मानले.