जामखेड ब्रेकिंग : धोत्री खून प्रकरणाचा उलगडा, मुख्य सुत्रधार अटकेत, खुनाचे धक्कादायक कारण आले समोर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । 7 नोव्हेंबर 2022 । ऐन लक्ष्मी पुजनाच्या दिवशी जामखेड शहराजवळील धोत्री शिवारात एका 30 वर्षीय तरूणाचा खूनाची घटना घडली होती, जामखेड पोलिसांनी अवघ्या 10 ते 15 दिवसाच्या आत या खून प्रकरणाचा छडा लावत मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळण्याची धडाकेबाज कारवाई पार पाडली आहे. याबाबत पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

Dhotri murder case unraveled, main conspirator arrested, shocking reason for murder revealed

जामखेड तालुक्यातील धोत्री शिवारातील कापूस जिनिंग मिलच्या गेटवर 24 ऑक्टोबर 2022 रोजी बीडच्या गेवराई तालुक्यातील संगमजळगाव गावातील गणेश शिवाजी वारे वय 30 वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. मयत तरुणाच्या पोटावर, पाठीवर, छातीवर, डोक्यावर, हातावर व पायावर काहीतरी टनक हत्याराने जबर मारहाण करुन जिवे ठार मारल्याचे निष्पन्न झाले होते.

याप्रकरणी मयताचे वडील शिवाजी मारुती वारे वय-52 वर्ष यांनी जामखेड पोलिस स्टेशनला अज्ञात आरोपींविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला होता. सदर घटनेचा सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडे हे तपास करत होते. जामखेड पोलिसांनी अवघ्या 15 दिवसांत या प्रकरणात वेगाने तपास करत गुन्ह्याची उकल केली.

मयताने आरोपीचा मोबाईल चोरल्याला संशय होता, याच कारणामुळे गणेश शिवाजी वारे याला मुख्य आरोपी दिपक रणजित भवर रा सावरगाव याने धोत्री शिवारातील कापूस जिनिंग मिलच्या गेटवर बेदम मारहाण करत जीवे ठार मारले होते. यावेळी आरोपी याने मयताला नग्न करून मारहाण केली होती. जामखेड पोलिसांनी केलेल्या तपासात ही बाब निष्पन्न झाली. या प्रकरणात आणखीन आरोपी वाढू शकतात अशी माहिती पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी दिली.

दरम्यान, धोत्री शिवारात खून प्रकरणातील मुख्य आरोपी दिपक रणजित भवर याला जामखेड पोलिसांनी 5 नोव्हेंबर रोजी अटक केली. त्याला जामखेड न्यायालयाने 10 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे, पोलिस उपनिरीक्षक अनिल भारती, राजू थोरात, पोलिस नाईक संंजय लाटे गुप्तवार्ता विभागाचे अविनाश ढेरे, बाळासाहेब तागड, आजिनाथ जाधव सह आदी उपस्थित होते.

दरम्यान, सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला, डीवायएसपी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या टीमने पार पाडली. या टीममध्ये तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे, पोलिस उपनिरीक्षक राजू थोरात, पोलिस उपनिरीक्षक अनिल भारती, पोलिस काँस्टेबल कोठूळे, विजय कोळी, आबासाहेब आवारे, डिबी पथकातील कर्मचारी आणि इतर कर्मचार्‍यांनी वेगाने तपास करत खून प्रकरणाचा छडा लावण्याची यशस्वी कामगिरी बजावली.