जामखेड : अधिकाऱ्यांनी भूमिपूजनाकडे पाठ फिरवल्यामुळेच आमदार रोहित पवारांचा डाव फसला –  गौतम कोल्हे यांची खरमरीत टीका

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । भाजप सरकारने जलजीवन मिशन योजनेंतर्गत मंजुर केलेल्या जवळा पाणी पुरवठा योजनेचे श्रेय घेण्याचा आमदार रोहित पवारांनी डाव आखला होता, परंतू सदर योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमाकडे अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्यामुळे त्यांना भूमिपूजन कार्यक्रम रद्द करावा लागला. यामुळे आमदार रोहित पवार यांचा जवळा पाणी योजनेचे श्रेय घेण्याचा डाव फसला, अशी खोचक टीका भाजपा ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष तथा जवळा गावचे माजी उपसरपंच गौतम कोल्हे यांनी केली.

आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत 20 कोटी रूपये खर्चाच्या पाणी योजनेचे भूमिपूजन 13 रोजी पार पडणार होते, परंतू हा कार्यक्रम अचानकपणे रद्द करण्याची नामुष्की आमदार रोहित पवारांवर ओढवली, यावरून आता भाजपकडून जोरदार टीका होवू लागली आहे. भाजपाचे ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष तथा जवळा गावचे माजी उपसरपंच गौतम कोल्हे यांनी आमदार रोहित पवारांना लक्ष्य करत जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

यावेळी बोलताना गौतम कोल्हे म्हणाले की, भाजप सरकारने जवळा पाणी योजना मंजुर केलेली आहे.विरोधकांना सदर योजनेचे भूमिपूजन करण्याचा काहीही अधिकार नाही, भूमिपूजन करण्याचा नैतिक अधिकार फक्त सत्ताधारी भाजपला आहे. परंतू असे असताना देखील सदर योजनेचे श्रेय लाटण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी भूमिपूजनाचा घाट घातला होता, परंतू त्यांचा हा डाव जवळेश्वराने उधळून लावला, म्हणूनच त्यांना भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द करावा लागला, अशी जोरदार टीका कोल्हे यांनी केली.

जवळ्यात नेमकं काय घडलं ?

आमदार रोहित पवार आज 13 रोजी जामखेड तालुक्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी चोंडी आणि हळगावला भेटी दिल्या. त्यानंतर ते बारा ते साडे बारा या वेळेत जवळा पाणी योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी जवळ्यात दाखल झाले. त्यानंतर रोहित पवारांचा ताफा शेळगाव रस्त्यावरील आयोजित कार्यक्रमस्थळी निघाला होता, मात्र अर्ध्या वाटेवरील महादेव नगर भागात हा ताफा अचानक थांबला. कार्यक्रमाकडे न जाता अर्ध्या वाटेतून रोहित पवारांचा ताफा पुन्हा जवळ्यात आला. पवारांच्या गाडीत बसलेल्या कार्यकर्त्यांना खाली उतरवून तो ताफा जामखेड रस्त्याने गेला.आमदार रोहित पवार हे भूमीपुजन न करताच दुसर्‍या गावाला निघून गेल्याने जनतेत मोठी नाराजी पसरली आहे.

MLA Rohit Pawar's plan failed as officials turned their backs on Bhumi Pujan - Gautam Kolhe criticizes

गेल्या अडीच वर्षात आमदार रोहित पवार जेव्हा – जेव्हा मतदारसंघातील एखाद्या गावाच्या दौऱ्यावर जायचे, तेव्हा त्यांना भेटण्यासाठी नागरिकांची झुंबड उडायची, मात्र गेल्या सहा महिन्यांपासून रोहित पवारांच्या कार्यक्रमांकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे, याचे ताजे उदाहरण सोमवारी जवळा दौऱ्यातही दिसले. आमदार रोहित पवारांच्या जवळा दौर्‍याकडे नागरिकांनी अक्षरशः पाठ फिरवली होती. यावरून आमदार रोहित पवारांची लोकप्रियता घसरू लागली आहे ? असेच चित्र मतदारसंघात निर्माण झाले आहे.

10 हजार लोकसंख्या असलेले जवळा हे जामखेड तालुक्याच्या राजकारणातील महत्वाचे गाव आहे. या गावासाठी सरकारने 20 कोटी रूपये खर्चाची पाणी योजना मंजुर केली. इतक्या मोठ्या योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमाबाबत आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयाकडून गाजावाजा न करता भूमिपूजन करण्याचा डाव का आखण्यात आला होता? भूमिपूजन सोहळ्यासाठी संपूर्ण गावाला निमंत्रण का देण्यात आले नव्हते?  हे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत जवळा पाणी पुरवठा योजनेचे सोमवारी भूमिपूजन संपन्न होणार होते, यासाठी शेळगाव रोडवरील माळावर मंडप टाकण्यात आला होता. परंतु अचानक कार्यक्रम रद्द झाल्याने हा मंडप सोडण्यात आला. भूमिपूजन न झाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती, तर जवळा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या.

कुठलाही गाजावाजा न करता भूमिपूजन कार्यक्रम घेण्यासाठी सरसावलेल्या आमदार रोहित पवार यांना भूमिपूजन कार्यक्रम न घेताच कार्यक्रम स्थळाहून माघारी फिरण्याची वेळ आली, यामुळे जामखेड तालुक्याच्या राजकारणात याची उलट सुलट चर्चा रंगली आहे.