फोटोंचा वापर करून राजकीय पोळी भाजण्यापेक्षा स्वता: च्या हिमतीवर लढा – दत्तात्रय कोल्हे

जामखेड, सत्तार शेख : जामखेड टाईम्स वृत्तसेवा । तुम्ही स्वर्गीय भाऊंच्या विचारांचे आहात तर, मग वेगळे का झालात ? एकत्र राहून निवडणुक लढवायला हवी होती, पण विरोधकांनी वेगळी चूल मांडली, आता वेगळी चूल मांडली आहे तर आमच्या नेत्यांचा फोटो वापरायचा अधिकार विरोधकांनी स्वता:हून गमावला आहे. त्यामुळे विरोधकांनी दिवंगत लोकनेत्यांच्या फोटोचा आणि नावाचा वापर करू नये, फोटोंचा वापर करून राजकीय पोळी भाजण्यापेक्षा स्वता: च्या हिमतीवर निवडणूक लढा असा इशारा स्व श्रीरंगराव कोल्हे यांचे सुपुत्र दत्तात्रय कोल्हे यांनी विरोधकांना दिला.

जामखेड तालुक्यातील सर्वात मोठ्या जवळा सोसायटीच्या निवडणुकीचा प्रचार आता तापला आहे. आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उडू लागला आहे. अनेक नेत्यांच्या प्रतिष्ठापणाला लागल्या आहेत. या निवडणुकीत शेतकरी विकास मंडळाचे पॅनलप्रमुख दत्तात्रय कोल्हे यांनी निवडणुकीतील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

यावेळी बोलताना पॅनलप्रमुख दत्तात्रय कोल्हे म्हणाले की, स्व शिवाजीराव (आण्णा) पाटील, स्व संभाजीराव (काका) पाटील, स्व श्रीरंगराव (भाऊ) कोल्हे, स्व प्रदिप (आबा) पाटील या दिवंगत लोकनेत्यांच्या नेतृत्वाखाली जवळा सोसायटीने प्रगती केली आणि अहमदनगर जिल्ह्यात नावलौकिक मिळविला, दिवंगत नेत्यांचा विचार जिवंत ठेवण्यासाठी गावातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येत शेतकरी विकास पॅनलची स्थापना केली आहे.

स्व भाऊंनी (स्व श्रीरंगराव कोल्हे) तालुका पातळीवर काम केले, राजकारणात त्यांनी सर्व समाज घटकांना सोबत घेत राजकारण केले. सर्वांना न्याय दिला, स्व भाऊंनी राजकारणात कधीच टोकाची भूमिका घेतली नाही, स्वता : दोन पाऊले मागे घेत दुसऱ्यांना संधी देणे हा भाऊंच्या राजकारणाचा महत्वाचा विचार होता, परंतू दुर्दैवाने सध्याच्या काही पुढाऱ्यांना हा विचार नकोय, त्यांना आता सगळचं आपल्याकडे पाहिजे अशी परिस्थिती आहे अशी खोचक टीका दत्तात्रय कोल्हे यांनी केली.

जवळा सोसायटीच्या प्रगतीत ज्या नेत्यांनी सिंहाचा वाटा उचलला त्या नेत्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. जनतेकडून शेतकरी विकास पॅनलला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आमचा विजय निश्चित आहे असेही दत्तात्रय कोल्हे यांनी स्पष्ट केले.

पहा live प्रचारसभा

जवळा ग्रामपंचायत निवडणुकीत विजयाचा गुलाल अंगावर पडल्यानंतर सरपंच व उपसरपंच एकदाच आमच्या वडीलांना भेटायला आले, ज्यांनी सत्तेवर बसवले त्यांनाच सरपंच उपसरपंच विसरले, कारभार करताना जेष्ठांना विचारात घेतले नाही, गावाच्या विकासासाठी जेष्ठांच्या अनुभवाचा फायदा करून घेतला नाही. मनमानी कारभार सुरू आहे, याचीच जनतेत चिड आहे अशी घणाघाती टीका दत्तात्रय कोल्हे यांनी यावेळी बोलताना केली.

शेतकरी विकास पॅनलची धुरा दिग्गज नेत्यांकडे

जवळा सोसायटीच्या निवडणुकीत लोकनेते स्व श्रीरंगराव कोल्हे आणि लोकनेते स्व प्रदीप आबा पाटील यांच्या आशीर्वादाने स्थापन झालेल्या शेतकरी विकास आघाडीचे नेतृत्व दिपक पाटील व दत्तात्रय कोल्हे हे करत आहेत,या मंडळाला माजी सरपंच शहाजी वाळुंजकर, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक डॉ.महादेव पवार, आर. डी. पवार, चेअरमन आजीनाथ हजारे यांनी पाठिंबा दिला आहे.