जामखेड : पालकांनो, अल्पवयीन मुलांच्या हातात मोटारसायकली देऊ नका, घटना घडते तेव्हा आपण पाहिलेली सर्व स्वप्ने बेचिराख होतात – पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । माझा मुलगा खूप स्मार्ट आहे, चांगला आहे, अभ्यासात हुशार आहे, चांगल्या शाळेत आहे, असे म्हणत आपण आपल्या मुलांच्या बाबतीत खूप स्वप्न रंगवतो, मात्र जेव्हा त्याच अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी देतो आणि अचानक एका दिवशी त्याच्यासोबत अपघाताची, घातपाताची घटना घडते तेव्हा आपण पाहिलेली सर्व स्वप्न बेचिराख होतात.तेव्हा आपल्याला वाटतं ही गाडीच दिली नसती तर? वेळीच लक्ष दिलं असतं तर? असा पश्चाताप करण्यापेक्षा पालकांनी वेळीच लक्ष देण्याची आवश्यकता आहे.पालकांनी अल्पवयीन मुलांच्या हातात मोटारसायकली देऊ नये, असे अवाहन पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी केले.

Jamkhed, parents, don't give motorcycles in the hands of minors, all your dreams come to naught when an incident happens - Police Inspector Sambhajirao Gaikwad

जामखेड तालुक्यातील हळगाव येथील गॅलॅक्सी इंग्लिश स्कूलच्यावतीने 17 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ अल्ताफ शेख यांनी पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांचे स्वागत केले.यावेळी पार पडलेल्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात बालगोपालांनी सादर केलेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रम पाहण्यात उपस्थित जनसमुदाय चांगलाच रमून गेला होता.

यावेळी पुढे बोलताना पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड म्हणाले की, डाॅ अल्ताफ शेख यांनी हळगावच्या माळरानावर गॅलॅक्सी इंग्लिश स्कूल सुरू करण्याचे आणि चालवण्याचे दाखवलेले धाडस केलं कौतुकास्पद आहे. या शाळेची सुरू असलेली प्रगती प्रेरणादायी आहे. गॅलॅक्सी इंग्लिश स्कूलने आयोजित केलेला वार्षिक स्नेहसंमेलन हा कार्यक्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा आहे.

गायकवाड पुढे म्हणाले की, सातवी नंतरच्या मुलांच्या वर्तणुकीत होणाऱ्या बदलाला आळा घालण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो, पण आपले प्रयत्न तोकडे पडतात, परंतू पालकांनी आपल्या पाल्याशी सतत संवाद वाढवत ठेवला पाहिजे. सध्या वयात आलेल्या मुला मुलींशी आई वडिलांचा संवाद हरवत चालला आहे.त्याच्यातूनच पळून जाण्यासारखे प्रकार होतात, अल्पवयीन मुलांमध्ये मारामारीचे प्रकार होतात, हे रोखण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना समाजशिक्षण देणे आवश्यक आहे.

आपला पाल्य आपल्या समोर अभिनय करत असताना, डान्स करत असताना, एखादं गाणं म्हणत असताना होणारा जो आनंद असतो तो खूप चांगला असतो पण दुर्दैवाने पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे हा आनंद मी माझ्या मुलांच्या बाबतीमध्ये आजपर्यंत उपभोगू शकलो नाही. मात्र सुदैव हे आहे की, इतर मुलांचा, इतर पाल्यांचा डान्स बघून आपलचं मुलं त्या ठिकाणी नाचतयं, त्या ठिकाणी बागडतयं, अश्या पध्दतीचं इमॅजिनेशन करायचं आणि समाधान मानायचं, असं मागच्या 15 – 16 वर्षांपासून चालू आहे, असे म्हणत पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी पोलिस खात्यात नोकरी करत असताना कराव्या लागणार्‍या त्यागावर भावनिक भाष्य केले.

आपली मुलं कोणाबरोबर बोलतात, कोणाबरोबर त्यांचे चांगले संबंध आहेत, त्यांची संगत कोणाबरोबर आहे, ही गोष्ट मुलांच्या आयुष्यावर खूप मोठी प्रभाव टाकणारी आहे. संगतीत घडवण्याची आणि बिघडवण्याची ताकद असते, त्यामुळे आपली लेकरं चांगल्या मुलांच्या संगतीत कशी राहतील याकडे पालकांनी जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे, असे अवाहन गायकवाड यांनी यावेळी केले.

कोरोना महामारीमुळे ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या हातात मोबाईल आले. शिक्षणापेक्षा प्रत्येक मुलाला सोशल मिडिया नावाचा आजार लागला आहे. सोशल मिडीयावर अपडेट राहण्यासाठी मुलं आणि मुली प्रयत्न करतात. आपले छान छान फोटो सोशल मिडीयावर अपलोड करतात. आणि तिथचं या मुला मुलींचा घात होतो. वयात आलेली मुलगी बाहेरच्यांच्या लक्षात येण्याआधी पालकांच्या लक्षात येणं ही काळाची गरज आहे. वयात आलेली मुलगी कोणाशी बोलते, कोणाशी चॅटिंग करते, फोनवर ती कोणाशी बोलत असते, याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्यांनी आपल्या घरातील मुलींशी सतत संवाद ठेवणे आवश्यक आहे. याकडेही पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांनी पालकांचे लक्ष वेधले.

अल्पवयीन मुले सध्या लाईक्सच्या मोहजाळ्यात अडकू लागली आहेत. सोशल मिडीयावर टाकलेल्या फोटोला किती लाईक मिळाले यावर आपण आपला आनंद शोधत असू तर ती गोष्ट खूप घातक आहे. आपल्या लेकरांवर चांगले संस्कार करण्याची जितकी जबाबदारी शिक्षकांची आहे, त्याहीपेक्षा अधिक जबाबदारी पालकांची आहे. लहान वयापासूनच पालकांनी मुलांवर अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. असे यावेळी गायकवाड म्हणाले.