जामखेड : हाळगावच्या शासकीय कृषि महाविद्यालयात ६५ वा महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्याच्या गौरवशाली इतिहासाचा गौरव करणारा दिवस म्हणजेच महाराष्ट्र दिन व जगभरातील कामगारांच्या चळवळीची आठवण करून देणारा दिवस म्हणजेच आंतरराष्ट्रीय कामगार दिन, इतिहासातील हे महत्वाचे दिवस एकता, प्रगती आणि आपल्या समाजाला आकार देण्यासाठी थोर व्यक्तींनी केलेल्या योगदानाची आठवण करून देतात. हे उत्सव आपला सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी, कामगारांच्या हक्कांसाठी आणि सामाजिक न्यायासाठी लढा देण्याची महत्त्वाची आठवण करून देतात असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल काळे यांनी केले. महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालय, हाळगावच्या प्रांगणामध्ये गुरुवार, १ मे, २०२५ रोजी सकाळी ८ वाजता वा महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाप्रसंगी, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल काळे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. दरम्यान आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील कामगारांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

यावेळी पुढे बोलताना डॉ. अनिल काळे म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पहात असतानाच द्विभाषिक राज्याचे एक शक्तिशाली राज्य व्हावे यासाठी लोकनेते, बुद्धिवादी, लेखक, पत्रकार यांनी मराठी भाषिक प्रदेश एकत्र आणण्याची कल्पना मांडली आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीद्वारे संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न १ मे, १९६० रोजी साकार केले. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनवी शिखरे पादांक्रांत करण्याचा निर्धार आपण या दिवशी करावयास हवा. आपल्या महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी सर्वांनी सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
विद्यापीठाचे माजी कुलगुरू कर्नल कै. डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीच्या मध्यवर्ती परिसरातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषि महाविद्यालयाचे हाळगाव येथे स्थलांतर होऊन दोन वर्ष यशस्वीरीत्या पूर्ण झाले. महाविद्यालयाच्या या विशेषदिनी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे त्यांनी अभिनंदन केले.

सदर कार्यक्रमास विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विवेकानंद कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. पोपट पवार, डॉ. प्रेरणा भोसले, डॉ. गोकुळ वामन, डॉ. मनोज गुड, डॉ. नजिर तांबोळी, डॉ. निलेश लांडे, डॉ. महेश निकम, डॉ. अंबादास मेहेत्रे, डॉ. निकिता धाडगे, डॉ. उत्कर्षा गवारे, अर्चना महाजन, डॉ. प्रणाली ठाकरे, डॉ. अविनाश हांडाळ, डॉ. किरण चौधरी, डॉ. संदीप मोरे, महादू शिंदे, डॉ. दिपक वाळुंजकर, शिक्षकेतर कर्मचारी अमृता सोनावणे, प्रदिप धारेकर, किरण अडसुर, शशिकांत कांबळे, मुबिन नदाफ, संजय सोनवणे, अनिता पुराणे, अनिकेत कुंभार, गंगाराम रंधवे, ग्रामस्थ आबासाहेब ढवळे, संदीप ढवळे, विद्यार्थी व सुरक्षा रक्षक उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विवेकानंद कुलकर्णी, शारीरिक शिक्षण निर्देशक डॉ. अविनाश हांडाळ यांनी विशेष मेहनत घेतली.
