मोठी बातमी : विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे यांच्या बारामती दौऱ्यात सुरक्षा आणि राजशिष्टाचारात कसूर करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या दौर्यावेळी गंभीर स्वरुपाच्या सुरक्षा विषयक त्रुटींसंदर्भात चौकशीअंती कर्तव्यात कसूर केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये एक वरिष्ठ पोलीस अधिकारी, तीन पोलीस अधिकारी आणि चार पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तीन पोलीस अधीकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी होणार असून इतर दोषी पोलीसांना दोन हजार रुपयांचा दंड बजावण्यात आला आहे. या कारवाईमुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणून गेले आहेत.

विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे हे १५ व १६ मार्च, २०२५ रोजीच्या बारामती दौर्यावर होते. या दौर्यावेळी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सुरक्षा व राजशिष्टाचार विषयक गंभीर त्रुटी झाल्याचे समोर आले होते. या घटनेची कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी गंभीर दखल घेत पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक यांना चौकशी करुन वस्तूनिष्ठ अहवाल सादर करण्याबाबत कळविले होते. त्यानुसार चौकशी करण्यात आली. प्राप्त अहवालाचे अवलोकन केले असता सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांच्या बारामती दौऱ्या दरम्यान सुरक्षा व राजशिष्टाचार विषयक गंभीर त्रुटी आढळून आल्या होत्या.
पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक यांनी केलेल्या चौकशीत 1).प्रवीण बाळासाहेब मोरे, पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा, पुणे ग्रामीण 2) श्री.रविंद्र कोळी, राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय, पुणे ग्रामीण 3) श्रीमती वैशाली पाटील, पोलीस निरीक्षक, बारामती तालुका पोलीस ठाणे यांच्याकडून कर्तव्यात कसूर झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबतचा अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांच्या कार्यालयास प्राप्त झाला. त्यानुसार कसूर केलेल्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे 1) श्रीमती सुवर्णा गायकवाड, परिविक्षाधीन महिला पोलीस उपनिरीक्षक, बारामती तालुका पोलीस ठाणे 2) श्री.शामराव यशवंत गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल, पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण 3) श्री.रोहित दिलीप वायकर, पोलीस शिपाई पोलीस मुख्यालय पुणे ग्रामीण 4) श्रीमती सारिका दादासाहेब बोरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल जिल्हा विशेष शाखा, पुणे ग्रामीण 5) श्री.वसंत सखाराम वाघोले, सहाय्यक फौजदार, पुणे ग्रामीण यांनी देखील कर्तव्यात कसूर केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांचेकडून त्यांना दंडनीय कारणे दाखवा नोटीस पाठवून खातेनिहाय चौकशीची कारवाई करण्यात येत आहे.