जामखेड तालुक्यात वीज कोसळून बैल ठार

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यात परतीच्या पावसाचे धुमशान सुरुच आहे. या पावसामुळे तालुक्यात सर्व लहान मोठे प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहे. तालुक्यातील नद्या वाहत्या झाल्या आहेत. आज 14 रोजी जामखेड तालुक्याला पुन्हा पावसाने झोडपून काढले. या पावसात तालुक्यातील दरडवाडी येथे वीज कोसळण्याची घटना घडली आहे. या घटनेत एका बैलाचा मृत्यू झाला आहे.

bull was killed by lightning in Dardwadi in Jamkhed taluka

जामखेड तालुक्यातील दरडवाडीच्या केकाणवस्ती परीसरात वीज कोसळली. यात लिंबाच्या झाडाखाली थांबलेल्या बैलाचा मृत्यू झाला. बाबुराव अर्जुन केकाण या शेतकऱ्याचा हा बैल होता. केकाण हे शेतात आपली जनावरे चारत होते त्यावेळी ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ होत आहे.

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार योगेश चंद्रे यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.संजय राठोड यांना याबाबत कळवत घटनास्थळी जाऊन शवविच्छेदन करण्याच्या सूचना दिल्या. एस. एस. सुरवसे व पाचरणे यांना सोबत घेऊन डॉ. संजय राठोड यांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर बैलाचे शवविच्छेदन केले. सदर बैलाच्या अंगावर वीज पडुन मृत्यू झाला आसल्याचे निदर्शनास आले. याबाबत मृत्यू झालेल्या बैलाच्या मालकास शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येईल अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली. 

दरम्यान, जामखेड तालुक्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. तालुक्यातील नद्यांना मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. अजूनही पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले आहे.