प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून जामखेड तालुक्याला 9 कोटींचा निधी मंजूर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । जामखेड तालुक्यातील विविध धार्मिक स्थळांचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश करून या स्थळांच्या विकासासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी आणण्यासाठी आमदार रोहित पवार यांच्याकडून पाठपुरावा केला जात आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी राज्य सरकारकडून 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. (9 crore sanctioned to Jamkhed taluka from Regional Tourism Development Scheme)

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील संत श्री गितेबाबा आणि संत सिताराम बाबा यांच्या समाधीस्थळ या तीर्थस्थळांंना राज्य शासनाने ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. आता प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून या दोन्ही तीर्थक्षेत्रांसाठी तब्बल 9 कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

संत भगवानबाबा संत यांचे गुरु संत श्री गितेबाबा तसेच संत सितारामबाबा यांचे खर्डा येथे समाधीस्थळ आहे. या ठिकाणी संत श्री भगवान बाबा यांना मानणार्‍या भक्तांसह इतर भक्तगण मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात. संत गीतेबाबा यांच्या समाधी स्थळी तर संत भगवान बाबा यांची पालखी विसाव्यासाठी थांबत असते.

समाधी स्थळांचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भक्तांना आणि संत भगवानबाबा यांच्या पालखीसोबतच्या वारकऱ्यांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सोयी-सुविधा मिळत नव्हत्या. त्यामुळे भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या ठिकाणी भाविकांना पुरेशा सुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक होते यासाठी आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेतला.

आमदार रोहित पवार यांच्या जोरदार पाठपुराव्यामुळे 6 जानेवारी 2022 रोजी संत श्री गितेबाबा आणि संत सिताराम बाबा यांच्या समाधीस्थळांना ’ब’ वर्ग दर्जा मिळाला दिला. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत 9 कोटी रुपये इतका भरघोस निधी मंजूर झाला असून त्यापैकी 6 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

या निधीतून सभामंडप, महंत निवासस्थान, प्रसादालाय, स्वच्छतागृह उभारण्यात येणार आहेत. पर्यटनस्थळाचा विकास झाल्यास या भागात पर्यटन वाढेल. वाढत्या पर्यटनातून स्थानिकांनाही रोजगार निर्माण होण्यासही मदत होईल.

त्यांची सेवा करण्याची संधी मला मिळतेय, हे माझं भाग्य

संत श्री भगवानबाबा, संत श्री गितेबाबा आणि संत श्री सिताराम बाबा यांना मानणार्‍या भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देऊन त्यांची सेवा करण्याची संधी मला मिळतेय, हे माझं भाग्य आहे. या परिसराच्या विकासासाठी पुढील काळात जास्तीत जास्त निधी आणण्याचा माझा प्रयत्न राहील असे आमदार रोहित पवार म्हणाले.

राशीनच्या जगदंबा मंदिरासाठी 3 कोटी मंजूर

आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांमुळे राशीनच्या जगदंबा माता मंदिराचा 24 कोटी रुपये खर्चाचा विकास आराखडा बनवण्यात आला आहे. त्यापैकी राज्य शासनाने 3 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या निधीतून प्रशासकीय इमारत आणि प्रसादालय उभारण्यात येणार आहे. या निधीपैकी 2 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत.