जामखेड तालुक्यात कर्जफेड प्रोत्साहनपर योजनेचे 2888 लाभार्थी, शासनाकडुन पहिली यादी जाहीर, पात्र लाभार्थ्यांनी तातडीने आधार प्रमाणिकरण करावे – देविदास घोडेचोर यांचे अवाहन

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । नियमित कर्ज फेडणारांसाठी महाराष्ट्र शासनाने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती  प्रोत्साहनपर योजना जाहीर केली असुन सदर योजनेमध्ये जामखेड  तालुक्यातील ५४ गावांतील एकुण २८८८ पात्र शेतकरी सभासदांची प्रथम यादी शासनाकडुन जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक निबंधक देवीदास घोडेचोर यांनी दिली.

2888 beneficiaries of loan repayment subsidy in Jamkhed taluka, first list announced by government, eligible beneficiaries should verify Aadhaar immediately - Devidas Ghodechor's appeal

महाराष्ट्र शासनाने महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ मधील प्रोत्साहनपर योजना जाहीर केली असुन सदर योजनेमध्ये जामखेड तालुक्यात एकुण ९४७० कर्जदार शेतक-यांची माहिती शासनास सादर करण्यात आलेली आहे. यापैकी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या अहमदनगर या सहकारी बँकेच्या सर्व शाखांमधील ८०१६ व जामखेड तालुक्यात सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे १४५४ इतक्य् शेतक-यांचा समावेश आहे.

सदर योजनेअंतर्गत जामखेड तालुक्यातील ५४ गावांतील एकुण २८८८ पात्र शेतकरी सभासदांची प्रथम यादी शासनाकडुन या कार्यालयास व संबंधित बँकेस प्राप्त झाली आहे. सदर लाभार्थी शेतक-यांच्या याद्या गावातील ग्रामपंचायत, सोसायटी व संबंधित बँकेची शाखा येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. या योजनेतून नियमित कर्ज फेडणार्‍यांना प्रोत्साहनपर 50 हजाराचे अनुदान दिले जाणार आहे.

  • पात्र शेतक-यांनी सदर यादीत आपले नाव तपासुन आपले आधार कार्ड व बँकचे पासबुक घेवुन आपल्या जवळच्या जिल्हा बँकेच्या शाखेत किंवा आपले सेवा केंद्रात जाऊन आपले आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे.
  • सदर आधार प्रमाणिकरण करतेवेळी आपला आधार क्रमांक बचत, खाते क्रमांक अथवा लाभाची रक्कम तपासुन घेवुनच आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे.
  • सदर बाबत आपणास आपला आधार क्रमांक बचत, खाते क्रमांक अथवा लाभाची रक्कम मान्य नसल्यास अथवा चुकीची असल्यास आपली तक्रार तयार करुन घ्यावी.

आधार प्रमाणिकरणासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे आधार प्रमाणिकरणासाठी कोणी शुल्काची मागणी केल्यास त्यास नकार द्यावा. सर्व शेतक-यांनी आधार प्रमाणिकरण लवकरात लवकर पुर्ण करुन घ्यावे जेणेकरुन प्रोत्साहनपर लाभाची रक्कम आपले खात्यावर लवकरात लवकर जमा करण्यात येईल. असे आवाहन सहाय्यक निबंधक देविदास घोडेचोर यांनी केले आहे.

२०१९ मध्ये महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू करण्यात आली होती. पण, अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड नियमित केली होती. त्यांना लाभ मिळाला नव्हता. त्यामुळे नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना शासनाने ५० हजार रुपयांची प्रोत्साहन अनुदान देणारी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ देणारी योजना लागू केली आहे.

२०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तीन वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास २७ जुलै २०२२ ला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. शेतकरी हा केंद्र बिंदू मानून ही योजना अंमलात आणण्यात आली असून नियमित परतफेड केलेले कर्ज प्रोत्साहन अनुदान असलेल्या ५० हजारापेक्षा कमी रक्कमेचे असल्यास त्यांनी उचल करून परतफेड केलेल्या रक्कमे एवढी रक्कम प्रोत्साहन अनुदान म्हणून देण्यात येणार आहे.